मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ ऑक्टोबर २०२५
मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत आज अक्षरशः धुमश्चक्री झाली. वकील गुणरत्न सदावर्ते यांचा गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील सदस्यांमध्ये झालेल्या तीव्र वादातून थेट हाणामारीपर्यंत परिस्थिती गेली. दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी एकमेकांवर हात उचलल्याची माहिती मिळत असून, या प्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बैठकीत भ्रष्टाचार आणि अश्लील वर्तनाचे आरोप एकमेकांवर करण्यात आले. आरोपांच्या वादातून परिस्थिती एवढी बिघडली की काही जणांनी बाहेरून लोकांना बोलावून मारहाण केल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, बैठकीतील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात एक व्यक्ती बैठकीचा व्हिडिओ शूट करण्यास विरोध करताना दिसते. त्यावर समोरच्या बाजूने आक्षेप घेतला असता, वाद पेटला आणि एका व्यक्तीने संतापाच्या भरात थेट बाटली फेकून मारल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले, शिवीगाळ आणि मारामारी झाली. हा संपूर्ण गोंधळ आता व्हायरल व्हिडिओच्या रूपाने चर्चेत आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, सदावर्ते पॅनल आणि शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांच्या पॅनलमधील संचालक या बैठकीत उपस्थित होते. बैठकीदरम्यान एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप सदावर्ते गटातील संचालकाने केला आणि त्यानंतर संतापाच्या भरात त्यांनी बाटली फेकून मारली. या घटनेनंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. हाणामारीत पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे.
अडसूळ गटाचे गंभीर आरोप
घटनेनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात अडसूळ गटाने सदावर्ते गटावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटलं आहे, “एसटी को-ऑपरेटिव्ह बँक ही एसटी कर्मचाऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभी राहिलेली आशियातील सर्वात मोठी सहकारी बँक आहे, पण आज या बँकेत भ्रष्टाचाराचे सावट पसरले आहे. संचालक मंडळ कामगारांच्या पैशांवर मौजमजा करत आहे.”
पुढे पत्रकात म्हटलं आहे, “बैठकीदरम्यान अडसूळ गटाने सदावर्ते गटातील गैरव्यवहार उघडकीस आणले, त्यानंतर सदावर्ते गटातील संचालकांनी बाहेरून महिलांना बोलावून आमच्यावर हल्ला केला. बैठकीत कपडे फाडणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ झाली. अखेर हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असून, सभासदांमध्ये प्रचंड नाराजी आहे.”
या घटनेमुळे एसटी बँकेच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. संचालक मंडळातील गटबाजी आणि वैयक्तिक स्वार्थामुळे बँकेच्या प्रतिष्ठेवर गडद छाया पडली आहे.