मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ ऑक्टोबर २०२५
राम मंदिर रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री घडलेला एक हृदयस्पर्शी प्रसंग सध्या संपूर्ण मुंबई आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. रात्री साधारण १ वाजता लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये सुरुवातीला गोंधळ उडाला, मात्र त्याचवेळी एका तरुणाने तत्परतेने परिस्थिती हाताळली — त्याने आपत्कालीन चेन ओढून ट्रेन थांबवली आणि महिलेची प्रसूती केली.
या धाडसी कृत्याचा व्हिडिओ साक्षीदार मनजीत ढिल्लन यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यांनी लिहिले आहे — “त्या क्षणी असं वाटलं की देवानेच या भावाला त्या ठिकाणी पाठवलं.” व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला अत्यंत वेदनेत होती आणि बाळाचा अर्धा भाग बाहेर आला होता. तेव्हा त्या तरुणाने घाबरलेल्या अवस्थेतही धैर्य दाखवत मदत सुरू केली. त्याने लगेच एका महिला डॉक्टरला व्हिडिओ कॉल लावला आणि तिच्या सूचनांनुसार प्रसूती प्रक्रिया पार पाडली. काही मिनिटांतच बाळाचा सुरक्षित जन्म झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला पूर्वीच रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी तिला परत पाठवलं होतं. त्यामुळे तिचं कुटुंब तिला ट्रेनने घरी नेत असताना हा प्रसंग घडला. रुग्णवाहिका येण्यास वेळ लागल्याने, त्या तरुणानेच तिचे प्राण वाचवले.
मनजीत यांनी पुढे लिहिले, “त्या रात्री त्या तरुणाने दोन जीव वाचवले — आई आणि बाळ दोघांचेही. आम्ही सर्व प्रवाशांनी मिळून त्यांना रुग्णालयात पोहोचवले.”
या व्हिडिओने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडवली आहे. हजारो लोकांनी त्याचं कौतुक केलं असून, अनेकांनी त्याला “युनिफॉर्म नसलेला हिरो” असं संबोधलं आहे. एकाने लिहिलं, “आजच्या काळात अशी माणुसकी दुर्मिळ आहे,” तर दुसऱ्याने म्हटलं, “धैर्य, संवेदनशीलता आणि मानवीपणाचं असं सुंदर उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं.”
हा प्रसंग मुंबईच्या गर्दीतल्या आयुष्यात माणुसकीचा खरा चेहरा दाखवून गेला — एक अनोळखी तरुण, एका अनोळखी स्त्रीचा रक्षक बनला!