डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १६ ऑक्टोबर २०२५
Bigg Boss 7 फेम अभिनेता एजाज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, मात्र यावेळी कारण वाद नव्हे तर माणुसकी आहे. वृंदावनचे प्रसिद्ध संत प्रेमानंद जी महाराज यांना त्यांच्या खराब आरोग्यामुळे किडनीची गरज असल्याचे समजताच, एजाज खानने त्यांना आपली किडनी दान करण्याची तयारी दाखवली आहे.
एजाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत भावनिक संदेश दिला. त्यात तो म्हणतो, “अस्सलाम वालेकुम मित्रांनो. प्रेमानंद जी हे असे संत आहेत ज्यांनी कधीही कोणत्याही धर्माबद्दल वाईट बोलले नाही, नेहमी प्रेम आणि एकतेचा संदेश दिला. जर माझी किडनी जुळली, तर मी ती त्यांना निःसंकोच देईन. देव करो, ते आणखी शंभर वर्षे जिवंत राहोत आणि लोकांच्या कल्याणासाठी कार्य करत राहोत.”
या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर एजाजच्या निर्णयाचं प्रचंड कौतुक होत आहे. अनेकांनी त्याला “खऱ्या अर्थाने मानवतेचं उदाहरण” असं म्हटलं आहे.
दरम्यान, प्रेमानंद महाराजांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या भक्तांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या दोन्ही मूत्रपिंडांनी काम करणे थांबवले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात ते अशक्त आणि सुजलेले दिसत होते. त्यात त्यांनी स्वतः सांगितले होते, “माझी अवस्था गंभीर आहे, दोन्ही किडनी निकामी झाल्या आहेत. आता काही सुधारणा होण्याची शक्यता नाही. आता मला जावेच लागेल.”
महाराजांच्या अनेक भक्तांनी किडनी दान करण्याची इच्छा दर्शवली असली तरी, त्यांनी सर्वांचे प्रस्ताव नाकारले आहेत. याआधी राज कुंद्रा यांनीदेखील त्यांना किडनी दान करण्याची तयारी दर्शवली होती.
सध्या एजाज खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. श्रद्धा, मानवता आणि एकतेचा संदेश देणारा हा प्रसंग अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेला आहे.