मुंबई प्रतिनिधी :
दि. १६ ऑक्टोंबर २०२५
महाडीबीटी पोर्टवरील कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी ३२ लाख ६७ हजार २२५ लाभार्थ्यांची कृषी विभागातर्फे निवड करण्यात आली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. तेंव्हा, या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. तसेच कृषी यंत्रे/औजारांवरील जीएसटी च्या दरामध्ये घट (५ टक्के) करण्यात आलेली असून त्याचा देखील शेतक-यांना लाभ होणार आहे. याबाबतीत कृषी यंत्रे औजारे उत्पादक व विक्रेते यांनी गैरप्रकार केलेला आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
विक्रमी ३२ लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाल्यामुळे अतिवृष्टीतून सावरण्यासाठी या योजनेचा शेतक-यांना फायदा होणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना (DPR Based) कृषी यांत्रिकीकरण या तीन योजना महाडीबीटी पोर्टलवर राज्यात राबविल्या जात आहेत. दि.२२ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषी समृद्धी योजनेला मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर योजनेंतर्गत देखील कृषी यांत्रिकीकरण घटकासाठी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. आजपर्यंतच्या कार्यकाळात एका वर्षात जास्तीत जास्त सात लाख लाभार्थ्यांची निवड झाली आहे. परंतु, यावेळेस पहिल्यांदाच ३२ लाखांहून अधिक लाभार्थ्यांची निवड झाली आहे.
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव, कृषी आयुक्त व सर्व कृषी संचालकांच्या उपस्थितीत या योजनेसंदर्भात आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. त्यावेळेस कृषी यांत्रिकीकरण घटकांतर्गत प्रलंबित अर्जाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने व सर्व योजनांमधुन उपलब्ध होणारा निधी मोठ्या प्रमाणात असल्याने सर्व प्रलंबित अर्जांची निवड करण्याच्या सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी विभागास या बैठकीत दिल्या होत्या.शेतातील कामे करण्यासाठी मजुरांची कमतरता तसेच शेतीतील कामे जलद गतीने होणेसाठी शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ कृषी यांत्रिकीकरण योजनेतुन मिळावा यासाठी सन २०२५-२६ अंतर्गत वरील तीनही योजनांमधुन महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणा-या लाभार्थ्यांची प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्याने निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पावर टिलर, कंबाईन हार्वेस्टर, मनुष्यचलित यंत्रे, ट्रॅक्टर चलित औजारे, फवारणी यंत्रे, औजारे बँक इ. ची निवड करण्यात आलेली आहे.
यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, महाडीबीटी पोर्टलरवरील कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत ३३८४८४ लाभार्थ्यांची, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत २९२६६१४ लाभार्थ्यांची, राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी यांत्रिकीकरण (DPR Based) योजनेंतर्गत २१२७ अशा एकुण ३२६७२२५ लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याकरीता कुठलाही विशिष्ठ दिवसांचा कालावधी दिलेला नसून कोणताही अर्ज रद्द होणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही शेतक-याचा अर्ज आपोआप रद्द होणार नाही. निवड झालेल्या शेतक-यांना सदर योजनेतुन लाभ घ्यावयाचा नसल्यास त्यांची संमतीपत्र घेऊनच तालुकास्तरावरून अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळे शेतक-यांनी कोणत्याही प्रकारची शंका न बाळगता सहाय्यक कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून पुर्वसंमती मिळाल्यानंतर औजारे खरेदी करून योजनांचा लाभ घ्यावा. सर्व प्रलंबित अर्जाची निवड करण्याबाबतच्या सुचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विभागास दिल्यामुळे कृषी यांत्रिकीकरण योजनेचा विक्रमी शेतक-यांना लाभ मिळणार आहे.
कृषी यांत्रिकीकरण योजनांमधून मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यांत्रिकीकरणासाठी वरील तीन योजनांव्यतिरीक्त कृषि समृध्दी योजनेतून देखील निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सदर योजनांतून निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी कृषि यंत्र/औजारे खरेदी करून लाभ घ्यावा असे आवाहन मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे, मंत्री, कृषि, महाराष्ट्र राज्य यांनी केलेले आहे.