नाशिक प्रतिनिधी
दि. ०२ डिसेंबर २०२५
कोकणातील सहल संपवून नाशिककडे परत येत असलेल्या खासगी बसचा आज मंगळवारी पहाटे कराड तालुक्यात गंभीर अपघात झाला. वाटार गावाजवळ महामार्गावर हा प्रकार घडला असून, ३० ते ३२ विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. त्यापैकी एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, पिंपळगाव (जि. नाशिक) येथील विद्यार्थ्यांची ही सहल कोकणात आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा बस नाशिककडे प्रयाण केले होते. मात्र पहाटे वाटार गावाच्या परिसरात पोहोचल्यावर चालकाचा रस्त्यावरचा अंदाज चुकला आणि बस महामार्गावरून घसरत पुलाखाली कोसळली. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या कडेला खोल जागा होती आणि त्यामुळे वाहन थेट खाली पडले.
या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. गंभीर जखमी विद्यार्थ्यासह सर्व जखमींना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.







