रायगड प्रतिनिधी
दि. ०२ डिसेंबर २०२५
श्रीवर्धन तालुक्यात अंधश्रद्धेचा आधार घेत एका तथाकथित मांत्रिकाने अल्पवयीन मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे. “भूतबाधा काढतो” असा खोटा दावा करीत आरोपीने कुटुंबाचा विश्वास संपादन केला आणि २२ नोव्हेंबर २०२५ रोजी मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप पसरला असून, प्रकरणाची नोंद महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात झाल्यामुळे विशेष चर्चेला उधाण आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीने उपचाराच्या नावाखाली मुलगी आणि तिच्या आईला स्वतःच्या चारचाकीतून श्रीवर्धन येथे आणले. शहरात आल्यानंतर मुलीच्या आईला ‘उपचाराची तयारी’ असल्याचे सांगून समुद्रकिनारी बसवण्यात आले. त्यानंतर आरोपीने मुलीला एकटीला बाजूला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घरी परतल्यानंतर मुलीने कुटुंबीयांना आपल्यावर झालेल्या प्रकाराची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने श्रीवर्धन पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेत पोलिसांनी POCSO कायदा 2012, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 आणि भारतीय न्यायदंड संहिता 2023 मधील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा क्रमांक 145/2025 असा दाखल असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे श्रीवर्धन तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांकडून महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना आणि अंधश्रद्धेविरुद्ध अधिक व्यापक जनजागृतीची मागणी होत आहे.







