मुंबई प्रतिनिधी
दि. ०२ डिसेंबर २०२५
डोंगरी परिसरात चालत असताना गर्भवती महिलेची अचानक प्रसववेदना सुरू झाल्याने पदपथावरच प्रसूती झाल्याची घटना शनिवारी घडली. वेदनेने त्रस्त असलेल्या महिलेची माहिती मिळताच डोंगरी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रुग्णालयात नेण्याची तयारी सुरू असतानाच वेदना तीव्र झाल्याने महिलेची प्रसूती रस्त्यावरच झाली.
स्थानिक महिलांच्या मदतीने पोलिसांनी वस्त्रांचा आडोसा तयार केला आणि प्रसूतीदरम्यान महिलेचे संरक्षण केले. बाळ जन्मल्यानंतर दोघांनाही काळजीपूर्वक कपड्यात गुंडाळून जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने नाळ कापण्यासह आवश्यक उपचार करून आई-बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.
घटनेचा क्रम
धारावी येथील ३६ वर्षीय माला नाडर या आपल्या पतीसोबत डोंगरी परिसरातून चालत होत्या. अचानक पोटात वेदना वाढल्याने त्या पदपथावर बसल्या आणि पुढे हालचाल करणे त्यांना शक्य झाले नाही. स्थानिक नागरिकांनी लगेचच पोलिसांना माहिती दिली. काही क्षणांत डोंगरी पोलिसांच्या दोन गाड्या तेथे पोहोचल्या.
महिला पोलिसांचा तत्पर आडोसा
वेदना अत्यंत तीव्र झाल्याने माला यांना हालवणे धोकादायक असल्याचे पोलिसांना जाणवले. कॉन्स्टेबल खडसे यांनी तातडीने चादरी आणि वस्त्रांची व्यवस्था केली. महिला पोलिसांनी चारही बाजूने आडोसा करत सुरक्षित जागा निर्माण केली. त्याचदरम्यान माला यांनी बाळाला जन्म दिला.
डॉक्टरांचे वेळेवर उपचार
प्रसूतीनंतर महिला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आई-बाळाला कपड्यात लपेटून सुरक्षितरीत्या पोलिसांच्या वाहनात ठेवले. नंतर त्यांना जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केली असून दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.







