अकोला प्रतिनिधी
दि. ०२ डिसेंबर २०२५
अकोट नगरपरिषद प्रभाग क्रमांक १५ मधील AIMIMच्या नगरसेवक उमेदवार उज्ज्वला तेलगोटे यांच्या पतीवर सोमवारी सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी झालेल्या या घटनेमुळे स्थानिक राजकारणात चांगलाच ताण निर्माण झाला आहे.
जखमी राजेश तेलगोटे हे मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना तिघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पसरताच त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली.
या संदर्भात अकोट शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पथके आरोपींचा शोध घेत आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे अकोट शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिस अधीक्षकांकडे निवेदन
AIMIMचे जिल्हा नेते आसिफ अहमद खान यांनी या प्रकरणाचा कसून तपास करून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत जिल्हा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन दिले. तसेच, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व कायदा हातात घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.







