पुणे प्रतिनिधी
दि. ०३ डिसेंबर २०२५
युगेंद्र पवार यांच्या अलीकडील विवाह सोहळ्यानंतर पवार कुटुंबातील लग्नसराई अजून थांबलेली नाही. आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व खासदार सुनेत्रा पवार यांचा मुलगा, जय पवार, लग्नबंधनात अडकत आहे. विशेष म्हणजे हा विवाह सोहळा महाराष्ट्रात किंवा भारतात नसून बहरीनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. ५ डिसेंबर रोजी जय पवार आणि ऋतुजा पाटील विवाहबद्ध होणार आहेत.
४ ते ७ डिसेंबर दरम्यान हा संपूर्ण समारंभ बहरीनमध्ये होणार आहे. पवार आणि पाटील कुटुंबीयांकडून फक्त ४०० जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे. पक्षातून प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनाच निमंत्रण मिळालं आहे.
समारंभाची रूपरेषा अशी आहे:
४ डिसेंबर – मेहंदी
५ डिसेंबर – हळद, वरात आणि मुख्य लग्न
६ डिसेंबर – संगीत
७ डिसेंबर – स्वागत समारंभ
सोहळा परदेशात असला तरी दोन्ही कुटुंबांत गेल्या काही दिवसांपासून मोठी तयारी सुरू आहे.
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचे लग्न ३० नोव्हेंबरला बीकेसी येथील जिओ सेंटरमध्ये झाले. त्या कार्यक्रमाला पवार कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार सर्वांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. त्यामुळे पवार कुटुंब आनंदाच्या प्रसंगी एकत्र येत असल्याचं पुन्हा दिसून आलं. काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी होणाऱ्या पत्नीसह शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेले फोटोही शेअर केले होते. त्यामुळे त्यांच्या लग्नातही शरद पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित राहणार अशी शक्यता आहे.
बहरीनमधील लग्नाची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. मर्यादित पाहुण्यांमध्ये हा खास सोहळा पार पडणार असून पवार आणि पाटील कुटुंबासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.







