मुंबई प्रतिनिधी
दि. ०३ डिसेंबर २०२५
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा वनडे आज दुपारी खेळला जाणार आहे. भारत सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. पहिल्या सामन्यात १७ धावांनी विजय मिळवल्यानंतर आता रायपूरमध्ये निर्णायक वातावरण तयार झाले आहे. पहिल्या सामन्यात आफ्रिकेने शेवटपर्यंत लढा दिला होता, त्यामुळे आज ते अधिक जोरात मैदानात उतरतील अशी अपेक्षा आहे. टीम इंडिया मात्र मोठे बदल करणार नाही असे संकेत आहेत.
भारतीय संघात फक्त एकच बदल होण्याची चर्चा आहे. कर्णधार के.एल. राहुल पहिल्या सामन्यातील फलंदाजी प्रदर्शनावर खूष असल्याने मुख्य संघ कायम राहू शकतो. वाशिंगटन सुंदरच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. सुंदरने रांचीतील सामन्यात फक्त तीन ओव्हर टाकल्या आणि १३ धावा केल्या. रेड्डी आल्यास मधल्या फळीत तरुण अष्टपैलू आणि वेगवान गोलंदाजांची ताकद वाढेल.
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा वेगवान गोलंदाजी सांभाळतील. फिरकी विभागात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव हीच जोडी राहणार आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी हा सामना विजयाचा असायलाच हवा. पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने ते आज सर्व ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या दृष्टीने मार्को यानसेन आणि कॉरबिन बॉश ही महत्त्वाची अष्टपैलू नावे ठरणार आहेत.
भारताची संभाव्य संघरचना:
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, नितीश कुमार रेड्डी, के.एल. राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.







