मुंबई प्रतिनिधी
दि. ०३ डिसेंबर २०२५
राज्यातील विधानसभा निवडणुकीतील गोंधळ सर्वांनी अनुभवला. आता नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्येही तिन्ही सत्ताधारी पक्षांनी, विशेषतः भाजपने, विविध मार्गांचा उघडपणे वापर केल्याचा आरोप विरोधक करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर काल राज्यभर मतदान पार पडत असतानाच, नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा आदेश दिला. राज्यातील सर्व नगरपालिका आणि नगर पंचायतींची मतमोजणी एकाच दिवशी, म्हणजे २१ डिसेंबर रोजी घेण्यात यावी, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.
या निर्णयामुळे उमेदवारांची अनिश्चितता वाढली आहे. कारण साधारणपणे मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मिळणारा निकाल, आता न्यायालयाच्या निर्देशामुळे १९ दिवस पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे अनेक उमेदवार आणि पक्ष कार्यकर्ते नाराज झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाबद्दल अप्रसन्नता व्यक्त केली.







