पुणे प्रतिनिधी
दि. ०३ डिसेंबर २०२५
पुणे जिल्ह्यातील १२ नगर परिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी मंगळवारी (२ डिसेंबर) झालेल्या मतदानात सरासरी ६८ टक्के मतदारांनी सहभाग नोंदवला. निवडणूक बहुतांश ठिकाणी शांततेत पार पडली, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यामध्ये इंदापूर नगर परिषद ७९.८९ टक्के मतदानासह सर्वाधिक ठरली. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बारामती, फुरसुंगी आणि उरुळी देवाची या नगरपरिषदांचा तसेच काही प्रभागांचा अपवाद वगळता उर्वरित १२ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी मतदान झाले. मतदान सुरू होण्यापूर्वी ‘मॉक पोल’ घेण्यात आला आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.
सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत ८.३७ टक्के मतदान झाले. साडेअकरापर्यंत ही संख्या ११.८५ टक्क्यांवर पोचली. दुपारी १.३० पर्यंत ३५.६८ टक्के आणि साडेतीनपर्यंत ५१.०६ टक्के मतदान झाले. इंदापूरने याच वेळेत ६०.४१ टक्के आणि मंचर नगरपंचायतीने ६१.७५ टक्के मतदान नोंदवले होते.
दुपारनंतर मतदानाचा वेग वाढल्याने अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसल्या. जिल्ह्यातील ५२४ मतदान केंद्रांवर पाणी, स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वतंत्र केंद्रे, ज्येष्ठांसाठी सहाय्यक सुविधा, चाकाच्या खुर्च्या, सावली, सीसीटीव्ही, ईव्हीएमची सुरक्षा अशा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी ७६ आणि सदस्यपदासाठी ९५५ असे मिळून १,०३१ उमेदवार रिंगणात होते. जवळपास नऊ वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुकांमुळे उमेदवारांमध्ये आणि स्थानिक पातळीवर मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. अर्ज माघारी आणि चिन्हवाटपानंतर प्रचाराने जोर घेतला. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सभा घेतल्या. विविध स्थानिक आघाड्यांमुळे स्पर्धा अधिक चुरशीची झाली.
मतदानासाठी नोंदणीकृत चार लाख ५१ हजार २५ मतदारांना सुखकर अनुभव मिळावा यासाठी प्रशासनाने सर्व व्यवस्था केली होती.
प्रभागनिहाय मतदान टक्केवारी
लोणावळा – ७१.३४
दौंड – ५९.३२
तळेगाव – ४९.२४
चाकण – ७४.२८
सासवड – ६७.०२
जेजुरी – ७८.०६
इंदापूर – ७९.८९
शिरूर – ७१.१४
जुन्नर – ६८.३९
आळंदी – ७५.६६
भोर – ७६.९६
राजगुरूनगर – ६८.८७
वडगाव – ७३.३३
माळेगाव – ७७.१९
मंचर – ७४.१९







