सांगली प्रतिनिधी
दि. ४ डिसेंबर २०२५
सांगलीतील आष्टा नगरपरिषद निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीत संशयास्पद वाढ झाल्याचा आरोप शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला असून, या मुद्द्यावरून शहर विकास आघाडीने स्ट्रॉंग रूमबाहेर तीव्र आंदोलन सुरू केले आहे.
मंगळवारी, २ डिसेंबर रोजी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या. मात्र, आष्ट्यात प्रशासनाने जाहीर केलेल्या रात्रीच्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाइन प्रकाशित केलेल्या आकडेवारीत मोठा फरक आढळल्याचा दावा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी केला आहे.
मतदान वाढीवरून संशय
विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉलमध्ये स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे. काल जाहीर झालेल्या मतदान टक्केवारीत आणि आज सकाळी दाखवलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ दिसून आल्याचा आरोप शरद पवार गटातील कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. वॉर्ड ३ मध्ये १३११ मतदार असताना ऑनलाइन आकडेवारीत मतदारसंख्या ४०७७ दाखवण्यात आल्याचा धक्कादायक मुद्दा त्यांनी मांडला आहे. त्यापैकी ३१०९ मतदारांनी मतदान केल्याचे दाखवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. इतर वॉर्डमध्येही अशाच तफावती समोर आल्याचा दावा आहे.
स्ट्रॉंग रूमबाहेर गोंधळ
मतदानात ‘रातोरात वाढ’ झाल्याचा आरोप करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूमसमोर ठिय्या मांडला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकही जमले असून, सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याची टीकाही करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
निकाल पुढे ढकलला
आज निवडणूक निकाल जाहीर होणार होता. मात्र या वादामुळे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आता २० डिसेंबरला काही प्रभागांत मतदान होणार असून, सर्व निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी घोषित केले जाणार आहेत.







