नाशिक प्रतिनिधी
दि. ४ डिसेंबर २०२५
कुंभमेळ्याच्या तयारीत तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीविरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाम व तिखट भूमिका मांडली आहे. “मोठी झाडं तोडून नवी झाडं लावणार म्हणजे माणसं मारली आणि त्यांना मूल बक्षीस दिलं, यासारखंच आहे,” अशा शब्दांत त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारला.
सरकारवर रोखठोक टीका
नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी तपोवनात सुरु असलेल्या झाडतोडीला सयाजी शिंदे यांनी कडाडून विरोध दर्शवला. “आपण एखाद्याला निवडून दिलं म्हणून सर्व अधिकार तुमच्याकडेच आहेत, असा अर्थ होत नाही,” असे ते म्हणाले. त्यांनी जागरूक नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी प्रत्यक्ष भेट दिली.
“झाडं नाहीत अशा उजाड माळरानावर कुंभमेळा आयोजित करता येईल. पण हिरवळ नष्ट करणं चुकीचं आहे. झाडं वाचवणं हे माणसांपेक्षा महत्त्वाचं आहे. ५० फूट उंच झाडांची तोड करून नवी रोपं लावण्याची गोष्ट म्हणजे मूळ प्रश्नाला मोठी पळवाटच,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
‘झाडांवर राजकारण करू नका’
राजकारणातील बारकावे आपल्याला कदाचित माहित नसतील, परंतु “झाडांबाबत राजकीय खेळी चालवू नये,” अशी विनंतीही त्यांनी केली. अजित पवारांसह भाजपच्या काही नेत्यांनीही पाठिंबा दिल्याचा त्यांनी उल्लेख केला. “सर्व झाडं जिवंत राहिली पाहिजेत, एवढाच माझा आग्रह,” असे ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते–सयाजी शिंदे यांच्यात शब्दयुद्ध
“साधू-संत आले गेले तरी काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर मात्र मोठं नुकसान होतं,” या शिंदेंच्या वक्तव्यावर गुणरत्न सदावर्ते यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावर सयाजी शिंदेंनी, “मी माझ्या जागी बरोबर आहे, इतरांनी काय बोलावं हे त्यांचं स्वातंत्र्य,” अशी संयत प्रतिक्रिया दिली.
सरकारची प्रतिक्रिया : अजित पवार – फडणवीस
सयाजी शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं. पर्यावरण आणि विकास यांचा समतोल राखणं गरजेचं असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही लोक “राजकीय हेतूने पर्यावरणवादी” झाल्याची टीका केली. “कुंभमेळा आणि पर्यावरण दोन्ही महत्त्वाचे आहेत. काही जण मुद्दाम अडथळे निर्माण करत आहेत, पण ते होऊ देणार नाही,” असे ते म्हणाले.
कलाकारांचा मोठा निषेध मोर्चा
तपोवनातील वृक्षतोड रोखण्यासाठी नाशिकमधील अनेक कलाकार एकत्र आले. नाटक, चित्रपट, संगीत आणि कला क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन भव्य आंदोलन केलं.
अनिता दाते म्हणाल्या, “लहानपणापासून तपोवन पाहते आहे, इथली हिरवाई जपलीच पाहिजे.”
तर चिन्मय उदगीरकर यांनी “तपोवन वाचवा, तपोवन वाढवा,” असा नारा दिला.







