डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. ०५ डिसेंबर २०२५
युक्रेन युद्धानंतर प्रथमच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारताच्या भेटीस आले आहेत आणि या भेटीकडे जागतिक राजकारणात विशेष लक्ष लागले आहे. भारत–रशिया संबंधांचा पाया जरी दशकांपासून मजबूत मानला जात असला, तरी आज परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही देशांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत, जागतिक दबाव वाढला आहे आणि त्यामुळे प्रत्येक हालचाल अत्यंत विचारपूर्वक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारताकडून रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आणि संरक्षणसाहित्याची खरेदी होते, परंतु भारताचा स्पष्ट सूर असा आहे की या व्यापारात संतुलन असलं पाहिजे. वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी अलीकडेच यावर भाष्य केलं आणि भारताला रशियाकडून अधिक खरेदी करवून घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. या भूमिकेला रशियानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी स्वतः भारताकडून आयात वाढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रे आर्थिक आघाडीवर एकाच दिशेने विचार करत असल्याचा संदेश जगाला देण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं.
रशियासाठी मात्र संरक्षण सहकार्य ही अजूनही सर्वात महत्त्वाची कडी आहे. SU-57 सारख्या प्रगत लढाऊ विमानांपासून ते S-400 प्रणालीवरील संभाव्य चर्चा—हे रशियाच्या अजेंड्यावर ठळकपणे आहे. भारत मात्र या भेटीत संरक्षण करारांपेक्षा व्यापार, टेक्नोलॉजी ट्रान्सफर आणि आर्थिक सहकार्यावर अधिक भर देताना दिसतो. भारतासाठी स्वस्तात मिळणारं रशियन तेल, अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञान, पाणबुडी प्रकल्पातील सहकार्य ही महत्त्वाची क्षेत्रं राहिलीच; परंतु त्यासोबत अमेरिका, युरोप आणि रशिया या तिन्ही आघाड्यांवर तोल सांभाळणं हे भारताचं मोठं आव्हान आहे.
दुसरीकडे रशियासाठी भारत हा पश्चिमेकडून बसलेल्या आर्थिक निर्बंधांमध्ये मोठा आणि विश्वसनीय भागीदार आहे. व्यापार, संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्रातील दीर्घकालीन सहकार्य रशियाला या काळात अधिक उपयुक्त ठरत आहे. BRICS, SCO, UN सारख्या बहुपक्षीय मंचांवर भारतासोबतची सामंजस्याची परंपराही रशियाला लाभदायी ठरते. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांच्या गरजा ओळखून ‘परस्पर हित’ या सूत्रावर संवाद साधताना दिसतात.
या दौऱ्याचा सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे त्याचं टायमिंग. G20 परिषदेत पुतिन भारतात आले नव्हते. युक्रेन युद्धानंतरचा हा त्यांचा पहिला दौरा. त्यामुळे या भेटीतून कोणते संकेत दिले जातात, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्सुकतेचं कारण आहे. माजी परराष्ट्र सचिव शशांक यांच्या मते, दोन्ही देशांवर वेगवेगळा पण गंभीर अशा प्रकारचा दबाव आहे—रशियावर पश्चिमेकडून आर्थिक निर्बंधांचा, तर भारतावर अमेरिकन टॅरिफचा. या पार्श्वभूमीवर भारत–रशिया संबंधांतला विश्वास जपणं हे दोघांसाठी महत्त्वाचं आहे. त्याच वेळी, संबंधांना फार मोठा आवाज न देता, शांत आणि सावध कूटनीतीने पुढे जाण्याचीही दोघांची इच्छा आहे, जेणेकरून इतर जागतिक शक्तींमध्ये अनावश्यक तणाव निर्माण होऊ नये.
एकूण परिस्थितीकडे पाहता, पुतिन यांच्या भारत भेटीतून मोठमोठ्या घोषणा होण्याची शक्यता कमी असली, तरी जुन्या करारांमध्ये सुधारणा, आर्थिक दिशादर्शक निर्णय आणि परस्पर हिताच्या चर्चेत काही ठोस मुद्दे पुढे येऊ शकतात. दोन्ही राष्ट्रे एकमेकांसाठी आजही महत्त्वाची आहेत; फक्त या मैत्रीचा आजचा अवतार अधिक मितभाषी, सावध आणि काळाची गरज ओळखणारा झाला आहे.







