नाशिक प्रतिनिधी :
दि. ०६ डिसेंबर २०२५
नाशिकमध्ये सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीविरोधात आंदोलन चांगलंच पेटून उठलं आहे. तपोवन परिसरातील झाडांवर कुर्हाड कोसळणार असल्याने नागरिक तसेच अनेक मान्यवर रस्त्यावर उतरले आहेत. या संपूर्ण घडामोडींवर काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया नोंदवत व्यंगात्मक पोस्ट टाकली असून तिची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. तब्बल 21 महिने चालणाऱ्या या महाकुंभासाठी नाशिकमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, अमृतस्नानासाठी लाखो साधू-संत आणि भाविकांचा ओघ अपेक्षित आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात येत असून यासाठी प्रचंड निधी मंजूर करण्यात आला आहे.
तथापि, तपोवन येथे साधुग्राम उभारण्यासाठी जवळपास १८०० झाडांची तोड होणार असल्याची माहिती बाहेर येताच स्थानिक नागरिक आणि विविध पक्षांनी जोरदार विरोध सुरू केला. आंदोलनाची लाट उसळल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही राज्यातील एका वरिष्ठ व्यक्तीवर टोला लगावत पोस्ट शेअर केली आहे. ‘झाडंखाऊ’ असा शब्द वापरत त्यांनी त्यांच्या नाराजीची उघडपणे अभिव्यक्ती केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
काय आहे काँग्रेसचे व्यंगचित्र?
काँग्रेसने त्यांच्या फेसबुक पेजवर एक व्यंगचित्र टाकले आहे. या चित्रात सर्वत्र तोडलेली झाडे, त्यांचे उरलेले बुंधे आणि हातात कुऱ्हाड धरलेली एका मोठ्या व्यक्तीची आकृती दाखवली आहे— मात्र त्या व्यक्तीचा चेहरा जाणूनबुजून लपवला आहे. चित्राच्या वरच्या बाजूला ‘झाडंखाऊ’ असे ठळकपणे लिहिले आहे. या व्यंगचित्रातून नाशिकमधील वृक्षतोडीबाबतचा काँग्रेसचा संताप स्पष्ट दिसून येतो. पोस्टवर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कमेंट्स आणि प्रतिक्रिया येत असून ती सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.







