मुंबई प्रतिनिधी :
दि. ०६ डिसेंबर २०२५
महायुतीतील राजकीय समीकरणांवर प्रभाव टाकणारी एक महत्त्वाची बैठक पुढील दोन दिवसांत पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही या बैठकीत सहभागी होणार असून, सध्या महायुतीत सुरू असलेल्या एकमेकांच्या नेत्यांच्या ‘पक्षप्रवेश’ प्रकरणावर निर्णायक चर्चा अपेक्षित आहे.
पूर्वी महायुतीच्या समन्वयातून असा मौन करार झाल्याचे सांगितले जात होते की, सहयोगी पक्षांनी एकमेकांचे नगरसेवक, माजी नगरसेवक किंवा प्रमुख पदाधिकारी यांना आपल्या पक्षात घेऊ नये. तरीही अलीकडच्या काळात या मर्यादांचा भंग होत असल्याचे दिसत असून, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तणाव आणि नाराजी वाढताना दिसते.
दरम्यान, रवींद्र चव्हाण यांच्या प्रवेशाबाबत भाष्य करताना संजय शिरसाट यांनी “आम्हालाही मग फोडाफोडी करावी लागेल” असा इशारासदृश सूर लावला होता. त्यामुळे महायुतीच्या आंतरशिस्तीवर प्रश्न उभे राहिले आहेत.
आगामी बैठकीत मित्रपक्षांच्या नेत्यांना ‘पळवण्यावर’ पुन्हा कठोर निर्बंध आणण्याबाबत चर्चा होणार आहे. विरोधी पक्षांतील नेत्यांना सामील करून घेण्यास काही हरकत नसली, तरी महायुतीतील तिन्ही पक्षांनी परस्परांची घसघशीत फोडाफोड टाळावी, असे धोरण ठरवण्याचा प्रयत्न होणार आहे. यामुळे महायुतीची प्रतिमा अबाधित राहावी आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची नाराजी कमी व्हावी, हा प्रमुख उद्देश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.







