पुणे प्रतिनिधी :
दि. ०६ डिसेंबर २०२५
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र यावं, अशी चर्चा काही ठिकाणी जोर धरत होती. मात्र, शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या विचाराला ठाम विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर ते थेट शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली.
अलीकडच्या निवडणुकांमध्ये विविध पक्षांनी एकमेकांशी अनोख्या युती केल्याचे चित्र दिसले. त्यातच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील काही कार्यकर्त्यांनी मिळून निवडणूक लढण्याचा सुर लावला होता. मात्र, हा प्रस्ताव प्रशांत जगताप यांनी स्पष्टपणे फेटाळून लावत, अशा निर्णयामुळे पक्षातील कार्यकर्त्यांच्या भावनांवर आघात होईल, असे म्हटले होते. त्यांनी राजीनाम्याची शक्यताही व्यक्त केली होती.
आज शरद पवार यांच्या भेटीनंतर जगताप माध्यमांसमोर आले आणि त्यांनी याप्रकरणी महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार की नाही, हा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे.
प्रशांत जगताप काय म्हणाले?
जगताप यांनी सांगितले की, गेली साडेचार वर्षे दोन्ही गटांच्या विविध टप्प्यांत काम करण्याची संधी मिळाली. माजी महापौर म्हणून शहरातील समस्यांवर त्यांनी काम केले असून, संघटना मजबूत करण्याचेही प्रयत्न केले. “शरद पवार आमचे मार्गदर्शक आहेत. आम्ही महाविकास आघाडीच्या चौकटीत लढलो. काही जण मात्र अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याची भाषा करतात आणि त्यामुळे आघाडीत अडथळे निर्माण होतात,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीसह लढल्यास आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्यास काय परिणाम होऊ शकतो, याचा सविस्तर अहवाल ते शरद पवार यांच्याकडे सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अंतिम निर्णयाचा अधिकार शरद पवार यांच्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट करत, “मी स्वतःहून त्यात हस्तक्षेप करणार नाही, पण कार्यकर्त्यांचं भवितव्य धोक्यात येऊ नये, एवढीच माझी आग्रही भूमिका आहे,” असे मत व्यक्त केले.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीवर ‘नाही’चे शिक्कामोर्तब
महापालिका आणि जिल्हा परिषदेतील काही बालेकिल्ल्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची मागणी काही नेते व कार्यकर्त्यांकडून केली जात होती. परंतु, सभेनंतर जगताप यांनी स्पष्ट केले की, शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनाही फोनवरून कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यामुळे दोन्ही राष्ट्रवादी निवडणुका एकत्र लढवतील का, याबाबतची सुरू असलेली अटकळ अखेर संपुष्टात आली आहे. शरद पवार गट स्वतंत्रपणे आणि महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे चित्र आता स्पष्ट दिसू लागले आहे.







