मुंबई प्रतिनिधी :
दि. ०८ डिसेंबर २०२५
‘बिग बॉस’चा 19 वा सीझन अखेर संपन्न झाला असून, काल पार पडलेल्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेता गौरव खन्नाने विजेतेपद पटकावलं. समारंभादरम्यान शोचे होस्ट सलमान खान यांनी चाहत्यांसाठी एक मोठी अपडेट दिली. त्यांचा बहुप्रतिक्षित ‘किक 2’ हा चित्रपट लवकरच फ्लोअरवर जाणार असून, या सिनेमासाठी मराठमोळा कलाकार प्रणित मोरेचे नाव त्यांनी सुचवल्याचंही जाहीर केलं.
या सीझनमध्ये टीव्ही कलाकार, इन्फ्लुएन्सर्स आणि अनेक चर्चेत असणाऱ्या सेलिब्रिटींनी सहभाग घेतला होता. 7 डिसेंबरच्या रात्री झालेल्या फिनालेमध्ये गौरव खन्ना विजेता म्हणून घोषित झाला. दरम्यान, सलमान खानने ‘किक 2’संबंधी बोलताना प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं. काम लवकरच सुरू होत असल्याचं सांगत, सिनेमातील एका भूमिकेसाठी प्रणित मोरेची शिफारस केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
किक 2 ची घोषणा
एलिमिनेशनपूर्वी प्रणितला शोमध्ये त्याच्या ‘बॅगेज’बद्दल विचारलं असता, त्याने “मी बॉलिवूडमधील मोठ्या कलाकारांवर विनोद करायचो, तेच माझं बॅगेज होतं. पण ते इथेच सोडून जातोय,” असं सांगितलं. यावर सलमानने हसत उत्तर दिलं, “ते बॅगेज रिकामं करणं ही तुझी नव्हे, आमची जबाबदारी! मी आता ‘किक 2’ करत आहे आणि मी तुझं नाव 100 टक्के रेकमेंड करेन,” असे शब्द त्यांनी प्रणितला दिले.
2014 मध्ये प्रदर्शित झालेला सलमानचा ‘किक’ हा सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला होता. सलमानने त्यात देवी लाल सिंहची मुख्य भूमिका साकारली होती. चाहत्यांची मागणी लक्षात घेऊन सिक्वेलची तयारी सुरू झाली होती. 4 ऑक्टोबर 2024 रोजी नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने ‘सिकंदर’च्या सेटवरून सलमानचा फोटो शेअर करत ‘किक 2’ची अधिकृत माहिती दिली होती.
किकचं बॉक्स ऑफिस प्रदर्शन
140 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या ‘किक’ने तात्काळ बॉक्स ऑफिसवर दणका देत तब्बल 402 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट रवी तेजाच्या 2009 च्या तेलुगू सिनेमाचा हिंदी रिमेक होता. जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुडा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही भूमिका विशेष चर्चेत आल्या होत्या.
सलमान खान सध्या ‘किक 2’सोबतच आणखी एका मोठ्या प्रकल्पात व्यस्त आहे – ‘द बॅटल ऑफ गलवान’. या चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून, चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दलही प्रचंड उत्सुकता आहे.







