मुंबई प्रतिनिधी :
दि. ०९ डिसेंबर २०२५
कल्याण-डोंबिवली परिसरात भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वाद दिवसेंदिवस तीव्र होत आहे. राज्यात महायुती सत्तेत असली तरी स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष नेत्यांमध्ये जहरी शब्दयुद्ध रंगल्याने वातावरण तापले आहे. कल्याण पश्चिमेत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष वरुण पाटील हे परस्परांना थेट आव्हान देत असून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
महायुती असूनही अनेक पॅनलमध्ये दोन्ही पक्षांमध्ये टकराव सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अरविंद मोरे यांनी अत्यंत आक्रमक भाषण करत भाजपवर निशाणा साधला. “शत्रू भाऊ असला तरी लढाईत मारल्याशिवाय विजय नाही,” असे विधान करत त्यांनी भाजपला थेट इशारा दिला. तसेच, मागील विधानसभा निवडणुकीत बहुतेक जागा शिंदे यांच्या नेतृत्वामुळेच मिळाल्या असा दावा त्यांनी केला.
मोरे यांनी पॅनल क्रमांक दोन हा शिवसेनेचा पारंपरिक किल्ला असल्याचे सांगत, येथील कोणतीही जागा भाजपला न देण्याचा निर्धार व्यक्त केला. “युती असली तरी आमची भूमिका ठाम आहे. आम्ही धनुष्यबाणावरच निवडणूक लढवणार,” असे ते म्हणाले.
भाजपचा पलटवार
मोरे यांच्या वक्तव्यांवर भाजप नेते वरुण पाटील यांनी कठोर प्रतिक्रिया नोंदवली. “भाजपचा संयम म्हणजे कमजोरी नाही,” असे सांगत त्यांनी जशास तसे उत्तर देण्याची चेतावणी दिली. “कोणी युतीत मिठाचा खडा टाकणार असेल तर त्याला गय नाही,” असेही पाटील म्हणाले. अंतिम निर्णय जनता देईल, असे सांगत त्यांनी मोरे यांच्या विधानांवर टीका केली.
कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्षांतील फूट वाढत असून स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील अंतर्गत संघर्ष प्रकर्षाने समोर येत आहे. वरिष्ठ नेते एकीचा संदेश देत असले तरी स्थानिक पातळीवर युतीची अवस्था धोक्यात दिसत आहे.







