जळगाव प्रतिनिधी :
दि. १० डिसेंबर २०२५
महाराष्ट्रात सध्या EVM सुरक्षेचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरातील स्ट्राँग रूम्सभोवती पोलिस दल, सीआरपीएफ, अत्याधुनिक सीसीटीव्ही व्यवस्था अशा झेड प्लस स्तरालाही मागे टाकणाऱ्या कडेकोट सुरक्षा उपाययोजना तैनात करण्यात आल्या आहेत.
परंतु या सर्व शासकीय व्यवस्थेबरोबरच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनीही EVM सुरक्षिततेसाठी स्वतःचे खासगी रक्षक नेमणे आणि स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सुरू केले आहे. ही पद्धत प्रथम जळगावच्या पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या पुढाकारातून पाहायला मिळाली. त्यानंतर हे प्रवाह चाळीसगावमार्गे परभणीच्या गंगाखेडपर्यंत पोहोचला आहे. गंगाखेडमध्ये तर अजित पवार गटाच्या उमेदवारांनी प्रशासनाने बसवलेल्या कॅमेऱ्यांच्या शेजारीच स्वतःचे खासगी कॅमेरे उभारले आहेत.
EVM प्रणालीला पारदर्शक आणि निर्भेळ मतदानासाठी आणले असतानाच, या अतिसुरक्षेमुळे जनतेच्या मनात विश्वास वाढतोय की संशय, असा सवाल उपस्थित होत आहे.







