डीडी न्यूज प्रतिनिधी :
दि. १० डिसेंबर २०२५
कधी कधी नशिबाचा एक छोटासा क्षण आयुष्याला नव्या वळणावर नेऊन ठेवतो. जर्मनीतील एका मेट्रोमध्ये शांत, उदास आणि विचारात गढलेला भारतीय युवक एका लोकप्रिय जर्मन सेलिब्रिटीच्या शेजारी बसला—आणि त्या अनपेक्षित क्षणाने त्याचे संपूर्ण भविष्यच बदलून गेले.
या तरुणाला आपल्या शेजारी बसलेली मुलगी कोण आहे याची कल्पनाही नव्हती. पण हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. जर्मनीतील प्रसिद्ध मासिक “डेर स्पीगल” ने त्या भारतीय तरुणाचा शोध सुरू केला, आणि अखेर तो शोध म्युनिकमध्ये संपला. तेव्हा समजले की हा युवक जर्मनीत राहण्याची कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना तिथे राहत होता.
पत्रकाराने त्याला विचारले,
“तुला माहित आहे का, तुझ्या शेजारी बसलेली तरुणी म्हणजे गेम ऑफ थ्रोन्सची प्रसिद्ध अभिनेत्री मैसी विल्यम्स आहे? लाखो लोक तिच्यासोबत फोटो घेण्यासाठी स्वप्न बघतात, आणि तू मात्र शांत बसला होतास—का?”
युवकाने दिलेले उत्तर सर्वांना अंतर्मुख करून गेले—
“जेव्हा तुमच्याकडे राहण्याचा परवाना नसतो, खिशात एकाही युरोची ऐपत नसते आणि रोज ट्रेनमध्ये दडपून प्रवास करावा लागतो… तेव्हा तुमच्या शेजारी कोण बसले आहे, हे महत्त्वाचं राहत नाही.”
त्याची ही प्रामाणिक कबुली आणि कठीण परिस्थिती पाहून मासिकाने त्याला ८०० युरो महिन्याच्या पगारावर पोस्टमनची नोकरी दिली. नोकरीचा करार हातात येताच त्याला कायदेशीर निवास परवाना मिळण्यातही अडचण उरली नाही.
ही घटना दाखवते की कधी कधी जीवनातील साधीशी वाटणारी क्षणिक घटना भविष्यातील मोठ्या बदलाला कारणीभूत ठरते. नशिबाचे गणित कोणीच समजू शकत नाही—ते फक्त घडतं, आणि आयुष्य अचानक उजळून निघतं.







