नागपूर प्रतिनिधी :
दि. १० डिसेंबर २०२५
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात एक अनपेक्षित प्रसंग घडला. अवैध दारू विक्रीच्या मुद्द्यावर चर्चा करताना भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा संदर्भ दिला, आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहातच तावातावाने उतरले.
अभिमन्यू पवार यांच्या विधानांवर अप्रसन्न होत फडणवीसांनी थेट चेतावणी दिली—
“प्रत्येक विषयाला लाडकी बहीण योजनेशी जोडू नका. लाडक्या बहिणींविरोधात गेलात, तर घरी बसावे लागेल.”
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशांनुसार अवैध दारूविक्रीवर कारवाई होत नसल्याचा आरोप करत पवारांनी प्रश्न उपस्थित केला. परंतु त्यांनी हा मुद्दा योजनेशी जोडताच मुख्यमंत्री चांगलेच भडकले.
विशेष म्हणजे, अभिमन्यू पवार हे फडणवीसांचे माजी पीए असून औसा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आपल्या जवळच्या सहकाऱ्यालाच सार्वजनिकरित्या सुनावल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.






