रायगड प्रतिनिधी
दि. १३ डिसेंबर २०२५
रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदावरून शिंदे गटातील आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन आमदार—भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे—यांचा पालकमंत्रीपद तटकरे कुटुंबाकडे जाऊ नये, यासाठी ठाम विरोध आहे. तटकरे यांची कन्या आदिती तटकरे सध्या मंत्री आहेत, तर भरत गोगावले यांनाही मंत्रीपद आहे. या राजकीय रस्सीखेचेमुळे रायगड जिल्ह्याला अद्याप पालकमंत्री मिळू शकलेला नाही.
महायुतीतच वाढले अंतर्गत मतभेद
राज्यात सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील लढत अपेक्षित असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्षांमध्येच स्पर्धा, मतभेद आणि संघर्ष उफाळून आले. काही भागांत शिवसेना विरुद्ध भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, तर काही ठिकाणी शिवसेना–राष्ट्रवादी एकत्र विरुद्ध भाजप अशी समीकरणे तयार झाली. स्थानिक राजकारणाच्या गरजेनुसार या युती-आघाड्या आकाराला आल्या.
नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांतील नेत्यांनी एकमेकांवर उघडपणे टीका केली. विशेषतः रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला.
व्हिडिओ प्रकरणामुळे वादाला धार
विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ‘कॅशबॉम्ब’ नावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ कॉल, नोटांची बंडले आणि लाल टी-शर्टमधील एक अस्पष्ट व्यक्ती दिसत होती. या प्रकरणावरून शिंदे गटातील नेत्यांनी ती क्लिप बनावट असल्याचा दावा केला असून, ती सुनील तटकरे यांनीच दानवेंपर्यंत पोहोचवली असा आरोप करण्यात आला.
वाद थांबवण्यासाठी मध्यस्थी
या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले, उदय सामंत आणि अजित पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद अधिक चिघळू नये, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. रायगडच्या प्रश्नावर त्यांनी थेट भरत गोगावले आणि मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली.
बैठकीत दोन्ही पक्षांमधील संबंध आणखी ताणले जाऊ नयेत, यासाठी संयम बाळगण्याची विनंती करण्यात आली. यानंतर अजित पवार यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याशीही संवाद साधून वाद वाढू नये, याबाबत खबरदारी घेण्याचा सल्ला दिल्याची माहिती अनौपचारिक चर्चेत देण्यात आली.







