मुंबई प्रतिनिधी :
दि. १३ डिसेंबर २०२५
रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन आणि संजय दत्त यांचा हाय-ऑक्टेन स्पाय थ्रिलर ‘ धुरंधर ‘ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झाल्यापासून, हा चित्रपट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात कमाई केली.
‘धुरंधर’ ने रिलीजच्या आठव्या दिवशी किती कमाई केली?
आदित्य धर दिग्दर्शित स्पाय अॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. कारण आठवड्याच्या इतर दिवशीही सिनेमाने दररोज २० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २०० कोटींपेक्षा जास्त कमाई करून खळबळ उडवून दिली. आता तो रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवेश करत आहे आणि आठव्या दिवशीही त्याची उत्तम कामगिरी सुरू ठेवली आहे.
चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमाने २८ कोटींची सुरुवात केली. त्यानंतर, पहिल्या आठवड्यात ‘धुरंधर’ने २०७.२५ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार, ‘धुरंधर’ने रिलीजच्या आठव्या दिवशी ३२ कोटींची कमाई केली. यांसह, ‘धुरंधर’ची आठ दिवसांची एकूण कमाई आता २३९.५ कोटींवर पोहोचली आहे.
‘धुरंधर’ने ‘कांतारा चॅप्टर १’ ला मागे टाकलं
‘धुरंधर’ बॉक्स ऑफिसवर खऱ्या अर्थाने कामगिरी करत आहे. रिलीजच्या आठव्या दिवशी, चित्रपटाने दुसऱ्या शुक्रवारी ३२ कोटी कलेक्शन करून खळबळ उडवून दिली. या चित्रपटाने ऋषभ शेट्टीच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कांतारा चॅप्टर १’ च्या हिंदी आवृत्तीला मागे टाकलंय. त्यामुळे हा सिनेमा वर्षातील पाचवा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला.
‘धुरंधर’ दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे
‘धुरंधर’ची कमाई कमी होत नाहीये आणि चित्रपट दररोज नवीन विक्रमही रचत आहे. रिलीजच्या ८ व्या दिवशी, चित्रपटाने ‘गदर २’ (२०.५ कोटी रुपये), ‘चावा’ (२३.५ कोटी रुपये) आणि ‘पुष्पा २’ (२७ कोटी रुपये) यांचे रेकॉर्ड मोडले आणि दुसऱ्या शुक्रवारी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला.






