पुणे प्रतिनिधी :
दि. १६ डिसेंबर २०२५
पुणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अनेक ठिकाणी थेट सामना झाला होता. दोन्ही पक्षांमध्ये तब्बल ८५ जागांवर अत्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली. यापैकी ५० जागांवर भाजपला, तर ३५ जागांवर राष्ट्रवादीला यश मिळाले होते.
जर त्या वेळी महायुती एकत्र लढली असती, तर या ८५ जागांवर एकच उमेदवार दिला गेला असता आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला झाला असता. हीच बाब लक्षात घेता, यावेळी पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत ठेवण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा सुरू आहे. अंतिम उद्देश विजय हा महायुतीचाच व्हावा, अशी रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुणे–पिंपरीत तिरंगी लढतीची शक्यता
आगामी महापालिका निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी यांच्यात किमान तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू असून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र युती होण्याची दाट शक्यता असल्याने ही लढत तिरंगी होईल, असा दावा वरिष्ठ नेते करत आहेत.
मागील निवडणुकीत १६२ पैकी बहुतांश जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढले होते. सध्याच्या प्रभागरचनेतही जुन्याच समीकरणांचा प्रभाव असल्याने, दोन्ही पक्षांनी एकत्र लढल्यास अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार वगळले गेले असते. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला थेट लाभ मिळण्याची शक्यता होती. “दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा” टाळण्यासाठीच राष्ट्रवादीला महायुतीतून वेगळे ठेवले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मैत्रीपूर्ण लढत, पण सत्तेचा मार्ग खुला
या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी बहुतांश प्रभागांमध्ये स्वतंत्र उमेदवार देतील. जिथे भाजप मजबूत आहे तिथे राष्ट्रवादी माघार घेईल, तर जिथे राष्ट्रवादीला फायदा होतो तिथे भाजप सहकार्य करेल, अशी समजूत असल्याचे बोलले जाते. भाजप-शिवसेनेतील मतविभागणी न होता, महाविकास आघाडीच्या मतांमध्ये फूट पाडण्यावर भर दिला जात आहे. निकालानंतर गरज भासल्यास सत्तेसाठी हे पक्ष पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशीही शक्यता नाकारता येत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सांगितले की, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमच्या सत्ताकाळात चांगला विकास झाला आहे. आम्ही एकत्र आलो तर तिसऱ्याला फायदा होईल, हे राजकारण आम्हालाही समजते.”
दरम्यान, शिवसेना–भाजप युतीबाबत वरिष्ठ स्तरावर सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती शिवसेना (शिंदे गट) चे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी दिली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात या विषयावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.







