पुणे प्रतिनिधी :
दि. २५ डिसेंबर २०२५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीमुळे पुण्यातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपच्या महायुतीबाबत मात्र अद्याप संभ्रम कायम आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाचा तिढा न सुटल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, काहींनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन स्वबळावर निवडणूक लढविण्याची मागणी केली आहे.
शिवसेना-भाजप महायुतीतून पुणे महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर झाला असला, तरी आपटे रस्त्यावर झालेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतरही जागावाटपाबाबत कोणतेही ठोस सूत्र समोर आलेले नाही. महायुतीची एकत्रित बैठकही अद्याप झालेली नसल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढत आहे. दरम्यान, भाजपकडून शहरात पक्षविस्ताराची मोहीम वेगाने राबवली जात असून, पूर्वी उद्धव ठाकरे गटात असलेले माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघांत भाजपच्या इच्छुक उमेदवारांना सक्रिय पाठबळ दिले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही शहरस्तरीय पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेला केवळ नऊ-दहा जागा देण्याची चर्चा खासगीत सुरू असल्याचे समोर आले आहे. यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन भाजपकडून होणाऱ्या दुर्लक्षाबाबत तक्रार केली. पक्ष मजबूत ठेवण्यासाठी अधिक जागांची मागणी मान्य करावी, अन्यथा स्वबळावर निवडणूक लढवावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान, शिवसेनेतील काही शहरस्तरीय नेते मात्र अद्याप महायुती टिकवून ठेवण्याच्या भूमिकेत असून, अपेक्षित जागांची यादी पक्षप्रमुखांकडे सादर करण्यात आली आहे. बाहेरून आलेल्या नेत्यांना प्राधान्य दिले जात असल्याबाबत निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचेही चित्र आहे.
३५० इच्छुकांची यादी सादर
पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडे सुमारे ५०० इच्छुकांचे अर्ज आले होते. मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यातील ३५० इच्छुकांची अंतिम यादी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत शिवसेना-भाजप युतीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असून, जागावाटप आणि उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल, अशी माहिती शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी दिली आहे.






