मुंबई प्रतिनिधी :
दि. १४ जानेवारी २०२६
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार आता संपुष्टात आला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावत प्रचार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांनी निवडणूक वातावरण तापले होते. या संपूर्ण प्रचारकाळात मोठ्या प्रमाणावर पक्षांतराच्या घडामोडी घडल्या. मात्र प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसल्याची घटना समोर आली आहे.
दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा गटातील गोरेगाव विभागाचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे आणि त्यांची पत्नी, माजी नगरसेविका प्रमिला दिलीप शिंदे यांनी शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. या अनपेक्षित घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.
पक्ष संघटनाला बळ
या प्रवेशप्रसंगी उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी दिलीप शिंदे व प्रमिला शिंदे यांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होईल आणि आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला त्याचा लाभ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उद्धव ठाकरेंसाठी सत्तेची कसोटी
शिवसेनेतील फूटीनंतर मुंबई महानगरपालिकेतील सत्ता टिकवणे हे उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान ठरले आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत राज ठाकरे यांची मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय (आठवले गट) यांची आघाडी निवडणूक रिंगणात उतरली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची बनली असून, १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानानंतर मुंबईकर कोणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






