पुणे प्रतिनिधी :
दि. १५ जानेवारी २०२६
मतदानाला अवघे काही तास उरले असताना महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहेत. प्रचार थांबल्यानंतरही काही ठिकाणी छुप्या मार्गाने मतदारांना प्रभावित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अंधार पडताच सुरू असलेल्या या गैरप्रकारांमुळे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकांनी तातडीने कारवाई केली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला ‘ड’ प्रभागातील रहाटणी येथील गणराज कॉलनी परिसरात मतदारांना चक्क वॉशिंग मशीन वाटप केले जात असल्याची तक्रार आचारसंहिता कक्षाकडे प्राप्त झाली. त्यानंतर राहुल निकम यांच्या नेतृत्वाखालील एफएसटी भरारी पथकाने रात्री साडे दहाच्या सुमारास धाड टाकत एका वाहनातून तब्बल १९ वॉशिंग मशीन जप्त केली. संबंधित वाहनाचा क्रमांक MH14 KA 6330 असा आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी एसएसटी, एफएसटी आणि व्हीएसटी अशी विविध पथके कार्यरत असून, अशा प्रकारांवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
या प्रकरणावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “हे अत्यंत गंभीर आणि चुकीचे आहे. कोणीही दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील २८६९ जागांसाठी १५,९३१ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





