पुण्यात उभारणार ‘पाताळ लोक’!
वाहतूक कोंडीवर फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी मास्टर प्लॅन
मुंबई प्रतिनिधी :
दि. १५ जानेवारी २०२६
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पुण्याच्या विकासाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. अभिनेत्री गिरिजा ओक यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी पुण्यातील वाहतूक समस्येवर सविस्तर भूमिका मांडत शहरासाठी दीर्घकालीन आणि भव्य आराखडा सादर केला.
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाकांक्षी भुयारी मार्ग प्रकल्पाची घोषणा केली आहे. ‘पाताळ लोक’ या संकल्पनेतून शहरात सुमारे ५४ किलोमीटर लांबीचे टनेल उभारले जाणार असून, त्यात येरवडा ते कात्रजसारख्या प्रमुख मार्गांचा समावेश असेल. या भुयारी मार्गांमुळे पुण्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. अंदाजे ३२ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता शहरात २३ नवीन उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, त्यापैकी ८ पुलांचे काम सुरू झाले आहे, तर उर्वरित १५ पुलांची कामे येत्या तीन महिन्यांत सुरू होतील, असे फडणवीस यांनी सांगितले. हे उड्डाणपूल किमान २० ते २५ वर्ष कोणतीही तोडफोड न करता टिकतील, अशा पद्धतीने बांधले जाणार आहेत.
पुण्यात आता जमिनीवर आणि वर दोन्ही ठिकाणी जागेची कमतरता असल्याने, उपाय म्हणून ‘पाताळ लोक’ म्हणजेच भुयारी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरात सुमारे ५४ किलोमीटर लांबीचे टनेल तयार करण्यात येणार असून, येरवडा ते कात्रज, पाषाण–कोथरूड आणि औंध–संगमवाडी या प्रमुख मार्गांचा त्यात समावेश असेल. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी अंदाजे ३२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या टनेल्समध्ये कोणतेही पार्किंग किंवा फेरीवाल्यांना परवानगी दिली जाणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आधुनिक टनेल बोअरिंग मशीनमुळे पूर्वी सहा वर्षे लागणारे काम आता दोन ते अडीच वर्षांत पूर्ण होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे टनेल ‘ट्विन’ स्वरूपाचे असतील, म्हणजे एक येण्यासाठी आणि एक जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग असणार आहेत. काही ठिकाणी एकावर एक असे टनेल असतील, ज्यात खालून मेट्रो आणि वरून वाहनांची वाहतूक होईल.
याशिवाय पुण्यात सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईप्रमाणेच पुण्यातही सिंगल तिकीटवर संपूर्ण प्रवासाचे नियोजन करता येईल, अशी प्रणाली राबवली जाणार असून, त्यामुळे खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होऊन शहरातील गर्दी आणि कोंडी कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.





