पुणे प्रतिनिधी :
दि. १६ जानेवारी २०२६
पुणे महापालिकेचा कारभार पुढील पाच वर्षे कोणाच्या हाती जाणार, हे आज (शुक्रवारी) दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिला निकाल ११ ते साडेअकरा वाजेदरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारी तीन ते साडेतीनपर्यंत संपूर्ण शहरातील मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
‘सील’बंद ईव्हीएम उघडणार; उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
मतदान संपल्यानंतर सर्व ईव्हीएम तातडीने ‘सील’ करून मतमोजणी केंद्रांवरील ‘स्ट्राँगरूम’मध्ये हलविण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. ईव्हीएममध्ये बंद झालेले उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज सकाळी खुले होणार आहे.
१६५ जागांसाठी ४१ प्रभागांतून निवड; १५ निर्णय अधिकारी नियुक्त
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांतून एकूण १६५ नगरसेवक निवडून येणार आहेत. यामध्ये ४० प्रभाग चार सदस्यीय असून, एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय १५ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिकेने सविस्तर मतमोजणी कार्यक्रम जाहीर केला आहे.
पोस्टल मतांची मोजणी आधी; त्यानंतर ईव्हीएमचे निकाल
सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू केली जाईल. मतदान यंत्र ‘सील’बंद असल्याची खात्री पक्षांच्या प्रतिनिधींसमोर करून घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.
आंबेगाव–कात्रजचा निकाल उशिरा? १० फेऱ्यांमुळे विलंबाची शक्यता
प्रभागनिहाय मतमोजणी फेऱ्यांचा विचार करता, १३ प्रभागांमध्ये सर्वांत कमी चार फेऱ्या होणार असून, तेथील निकाल तुलनेने लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, पाच सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर–आंबेगाव–कात्रज येथे तब्बल १० फेऱ्या होणार असल्याने या प्रभागाच्या निकालाला विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कसबा, कोंढवा परिसरात सर्वाधिक फेऱ्या; निकालासाठी उत्सुकता
क्षेत्रीय कार्यालयनिहाय केवळ दोन प्रभागांचा समावेश असलेल्या कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुप्पर इंदिरानगर आणि प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक–येवलेवाडी येथे प्रत्येकी १२ फेऱ्या होणार आहेत. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग २०, २१, २६) तसेच कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय (प्रभाग २५, २७, २८) अंतर्गतही १२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे येथील निकाल तुलनेने लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रभाग ३५चा निकाल सर्वांत आधी; दोन जागा बिनविरोध
प्रभाग क्रमांक ३५ मधील दोन जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने या प्रभागाचा निकाल सर्वांत आधी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतमोजणीच्या सुरुवातीलाच काही निकाल स्पष्ट होतील.
अशी पार पडेल मतमोजणी प्रक्रिया
सर्वप्रथम पोस्टल मतांची मोजणी होईल.
त्यानंतर ईव्हीएममधील मतदानाची मोजणी केली जाईल.
प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाशी संलग्न पहिल्या प्रभागातील सर्व फेऱ्या पूर्ण केल्या जातील.
त्यानंतर पुढील प्रभागातील मतमोजणी सुरू होईल.
पहिली फेरी अर्ध्या तासात; साडेतीन–चारपर्यंत प्रक्रिया पूर्ण
मतमोजणीतील पहिल्या फेरीस साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता असून, त्यानंतरच्या फेऱ्या १५ ते २० मिनिटांत पूर्ण होतील. पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो, तर साडेतीन ते चार वाजेपर्यंत संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली आहे.



