पुणे प्रतिनिधी :
दि. २१ जानेवारी २०२६
महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला मोठा हादरा बसला असून, पक्षातील एक बडा नेता अजित पवारांची साथ सोडत भाजपमध्ये दाखल झाला आहे.
महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने राज्यभरात दमदार कामगिरी करत सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले आहेत. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांप्रमाणेच महापालिकांमध्येही भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर शिवसेना (शिंदे गट) नेही उल्लेखनीय यश मिळवत राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून आपली ताकद सिद्ध केली आहे. अनेक महापालिकांमध्ये भाजप–शिवसेना (शिंदे गट) युतीचा फायदा दोन्ही पक्षांना झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
याच्या उलट, अनेक ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) सोबत युती न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याने पक्षाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अजित पवार गटाने राष्ट्रवादी (शरद पवार गट) सोबत युती केली होती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येऊनही अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत आणि या दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाली. संपूर्ण राज्यातच अजित पवार गटाला महापालिका निवडणुकांत मोठे नुकसान सहन करावे लागले असून, शरद पवार गटालाही त्याचा फटका बसला आहे.
दरम्यान, राज्यात आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला पहिलाच मोठा धक्का बसला असून, पक्षाचे नेते राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. अजित पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र गावडे हे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे सुपुत्र आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर झालेला हा प्रवेश राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.



