पुणे प्रतिनिधी :
दि. २१ जानेवारी २०२६
पुण्यातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरोधात गुन्हे शाखेने न्यायालयात तब्बल ६,४५५ पानी भलामोठे आरोपपत्र दाखल केले असून, या दस्तऐवजातून घायवळ टोळीचे अनेक धक्कादायक कट आणि कारवाया समोर आल्या आहेत. पोलिसांच्या या निर्णायक पावलामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरात आपली दहशत कमी होत असल्याची जाणीव झाल्याने निलेश घायवळ अस्वस्थ झाला होता. पुन्हा एकदा परिसरात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी त्याने ६ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशीच मोठ्या हिंसक कटाची आखणी केली. टोळीतील सदस्यांना भडकावताना तो, “तुम्ही फक्त धमाका करा, हत्यारं आणि पैसा मी देतो. कायदेशीर अडचण आली तर ती माझी जबाबदारी,” असे सांगत गुन्ह्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे आरोपपत्रात नमूद आहे.
या कटानुसार १७ सप्टेंबरच्या रात्री मुठेश्वर मित्रमंडळ चौकात थरारक घटना घडवण्यात आली. कोणताही वैयक्तिक वाद नसताना, केवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तिथे बसलेल्या नागरिकांवर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
या प्रकरणात आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान घायवळच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना दोन जिवंत काडतुसे आणि चार रिकाम्या पुंगळ्या सापडल्या, ज्यामुळे त्याच्याविरोधातील पुरावे अधिक ठोस झाले आहेत. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, आरोपींवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे.
हजारो पानांचे हे आरोपपत्र निलेश घायवळ टोळीच्या अडचणी वाढवणारे ठरणार असून, शहरातील कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी पोलीस आयुक्तालयाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. दरम्यान, या टोळीतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.






