मुंबई प्रतिनिधी :
दि. १७ फेब्रुवारी २०२६
अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्याचे पडसाद थेट अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमटताना दिसत आहेत. या घडामोडींमुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत लक्षणीय वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना कडक शब्दांत समज दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
प्रकरण नेमके काय?
अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. मंत्र्यांकडे प्रलंबित असलेल्या एका अपील अर्जावर अनुकूल निर्णय मिळवून देण्यासाठी ही रक्कम मागण्यात आल्याचा आरोप आहे. कारवाईदरम्यान कार्यालयातून ४२ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली, तसेच नाशिक येथील निवासस्थानीही झडती घेण्यात आली. या घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून सत्ताधारी पक्षाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
देवगिरी बंगल्यावर कोअर कमिटीची बैठक
प्रकरण उघड झाल्यानंतर काही काळ झिरवळ संपर्कात नसल्याची चर्चा होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांनी सोमवारी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर पक्षाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली. बैठकीत त्यांनी झिरवळ यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत स्पष्ट इशारा दिल्याचे समजते.
पक्षाची व सरकारची प्रतिमा मलीन होणार नाही याची दक्षता घ्या, तसेच प्रशासन तुमच्या कामकाजामुळे बदनाम होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी झिरवळ यांना सुनावले. बैठकीत उपस्थित वरिष्ठ नेत्यांनीही या मुद्द्यावरून त्यांना जाब विचारल्याची माहिती मिळते.
“चौकशी माझ्यापर्यंत आली तर राजीनामा देईन”
प्रकरण समोर आल्यानंतर नरहरी झिरवळ यांनी आपली भूमिका स्पष्ट करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला नाही. “माझ्या विभागातील कर्मचाऱ्याचा लाच प्रकरणात सहभाग आढळला, ही माझीही जबाबदारी आहे. या कृत्याला पाठीशी घातले जाणार नाही. चौकशीत धागेदोरे माझ्यापर्यंत पोहोचले तर मी तत्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर झिरवळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी या प्रकरणावरून सरकारवर जोरदार टीका सुरू केली असून झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरत आहे.






