सोलापुर प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. १८ जुन २०२१
सोलापुर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. सन २०१५ साली झालेल्या विधानपरिषद निवडणूकीत पंढरपुरचे दिवंगत नेते सुधाकरपंत परिचारक यांचे पुतणे प्रशांत परिचारक विजयी झाले होते. परिचारक यांनी विद्ममान आमदार दिपक साळुंखे पाटील यांचा मोठा पराभव केला होता. त्यानंतर गेल्या साडेपाच वर्षात सोलापुर आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर बरीच मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामूळे आगामी विधानपरिषद निवडणूकीत परिचारक यांच्या विरुद्ध दिलीप माने किंवा राजन पाटील यांना उमेदवारी मिळणार की आणखी कोणता उमेदवार असू शकतो का याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.
डिसेंबर २०१५ साली झालेल्या निवडणूकीत सोलापुर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३९६ मतदार होते. त्यापैकी ३९६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणूकीत विजयी उमेदवार प्रशांत परिचारक यांना २६१ तर, तत्कालीन विद्यमान आमदार दिपक साळुंखे पाटील यांना १२० मते पडली होती. तसेच, १५ मते अवैध ठरली होती. विशेष म्हणजे, त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व काँग्रेस आघाडी आणि मित्रपक्ष यांच्या मतांची संख्या जास्त होती. मात्र, परिचारक यांनी हात ढळता ठेवल्यामूळे आणि मतदारांना चांगल्या पद्धतीने लक्ष्मीदर्शन घडविल्याने सर्वपक्षीय मतदारांनी परिचारकांना विजयी केले. दिपक आबा आणि प्रशांत परिचारक यांच्या ओटीभरण कार्यक्रमांच्या रेट मध्ये जमीन अस्मानाचा फरक होता, अशी त्यावेळी जिल्हाभर चर्चा रंगली होती. कोटी च्या कोटी उड्डाने घेतलेली ही निवडणूक तेंव्हा सा-या महाराष्ट्रात चर्चेत होती. सन २०१५ च्या निवडणूकीनंतर कोणी दुध संघ लुटला तर कोणी जमिनी विकल्याच्या आरोप त्यावेळी करण्यात आला होता.
परिचारक यांच्यासाठी विजय अवघड, तर महाविकास आघाडीचे पारडे जड
आगामी विधानपरिषद निवडणूक परिचारक यांना सोपी राहिलेली नाही. कारण, २०१५ साली झालेल्या निवडणूकीत जिल्ह्यातील समविचारी नेत्यांचा गट परिचारक यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा होता. शिवाय, त्यावेळेस राज्यात भाजपाचे सरकार होते. त्यामूळे तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली समविचारी नेत्यांनी भाजपच्या वळचणीला जाऊन ती निवडणूक लढविली होती. सध्या, समविचारी पक्षाचे नेते बहुंताशी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये विभागलेले दिसतायेत. त्यामूळे महाविकास आघाडीचे पारडे जड दिसत आहे. शिवाय, राज्यात ही महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आहे. त्यामूळे सत्ताधा-यांच्या बाजूने ब-यापैकी कल राहू शकतो हा मतदारसंघाचा इतिहास आहे. मात्र, महाविकास आघाडीला फक्त कागदावरील संख्याबळ जास्त आहे म्हणून पाठीमागच्या सारखे विसंबून राहून चालणार नाही. विजयी होण्यासाठी तुल्यबळ व आर्थिक रसद पुरविणारा गब्बर उमेदवार द्यावा लागणार आहे. तरच, महाविकास आघाडीच्या विजयाचे गणित सुटू शकते.
महाविकास आघाडीकडून चर्चेत असणारी नावे
महाविकास आघाडीकडून पुर्वी काँग्रेसचे आमदार व सध्या शिवसेनेत असलेले दिलीप माने व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ म्हणून ओळख असलेले अनगरचे माजी आमदार राजन पाटील यांच्यात तीव्र स्पर्धा आहे. दिलीप माने यांनी आमदार प्रसाद लाड यांच्या विरुद्ध विधानपरिषदेची एक निवडणूक लढविली आहे. मात्र, त्या निवडणूकीत आमदारांचे मतदान होते. दिलीप माने व राजन पाटील हे दोन्ही ही सर्वार्थाने सक्षम उमेदवार समजले जात आहेत. याशिवाय, आणखी काही नावांची यामध्ये भर पडू शकते. दिपक साळुंखे पाटील ही उमेदवारीसाठी वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न करु शकतात. मात्र, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील व दिपक आबा यांच्यात पैरा ठरलेला आहे. पुढच्या २०२४ सालच्या निवडणूकीत शहाजी पाटील यांनी स्वतः माघार घेऊन दिपक साळुंखे यांना निवडून आणण्याचा शब्द दिला आहे. त्यामूळे दिपक साळुंखे आजच्या घडीला या खर्चिक गोष्टीत पडणार नाहीत अशी चिन्हं आहेत.
परिचारक यांच्यासाठी ‘समाधान’ देणारा आशेचा किरण
महाविकास आघाडीच्या निर्मितीनंतर प्रथमच सोलापुर जिल्ह्यात झालेल्या पंढरपुर-मंगळवेढा पोटनिवडणूकीत समाधान आवताडे यांचा झालेला विजय ही परिचारक यांच्यासाठी आशेचा किरण आहे. समाधान आवताडे यांचा पराभव झाला असता तर परिचारक यांना ब-याच अडचणींचा सामना करावा लागला असता. मात्र, परिचारक यांनी पंढरपुरातून दिलले मताधिक्य आणि आवताडेंचा झालेला विजय यामूळे परिचारकांच्या बाजूने आवताडे भक्कमपणे उभे राहू शकतात. तसेच आवताडे यांची मंगळवेढ्यासह जिल्ह्यातील २५ ते ३० मते परिचारक यांना मिळू शकतात. तसेच, २०२४ च्या निवडणूकीचा विचार करुन आवताडे कदाचित बाकी रसद ही परिचारकांना पुरवू शकतात. मात्र, या दोघांव्यतिरिक्त सोलापुर जिल्ह्यातील भाजपमध्ये सामसूम आहे. त्यामूळे परिचारक यांना महाविकास आघाडीसमोर निवडणूक लढविताना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच, सध्याच्या कोरोना महामारीत सढळ हाताने ओटीभरण करणे परिचारकांना गेल्यावेळच्या एवढे यावेळेस नक्कीच सोपे राहिले नाही. कारण, वरुन जरी परिचारकांचा डोलारा मोठा दिसत असला तरी आतून तो बराच पोखरलेला आहे. त्यामूळे सध्या ते प्रचंड आर्थिक ताण घेतील असं दिसत नाही.
राष्ट्रवादीला पंढरपुर मंगळवेढा पोटनिवडणूकीचा पराभव जिव्हारीः परतफेड करण्याची संधी
कै.आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत त्यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचा झालेला पराभव राष्ट्रवादीच्या आणि महाविकास आघाडीच्या जिव्हारी लागला आहे. विशेष म्हणजे, या निवडणूकीत भालकेंच्या पराभवला हातभार लावला आहे तेच परिचारक विधानपरिषदेच्या मैदानात असू शकतात. त्यामूळे राष्ट्रवादी व महाविकास आघाडी पोटनिवडणूकीत झालेल्या पराभवाचे उट्टे काढू शकते. तेंव्हा,महाविकास आघाडीला पराभवाची परतफेड करण्याची आयती संधी असणार आहे.
परिचारकांना ते वक्तव्य पुन्हा अडचणीचे ठरु शकते.
सन २०१५ साली परिचारक यांनी विधानपरिषद निवडणूकीत चांगल्या मताधिक्याने विजय मिळविल्यावर त्यांनी जोशमध्ये येत एका सभेत भारतीय सैनिकांबद्दल चुकीचे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची त्यांना त्यांच्या राजकीय व सामाजिक जीवनात फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. एक वर्ष त्यांना विधानपरिषद सभागृहात निलंबित करण्यात आले होते. तसेच, जनतेच्या रोषामूळे सार्वजनिक जीवनात ही ब-याच मर्यादा त्यांना आल्या होत्या. त्यामूळे स्वतः विधानसभेची निवडणूक टाळून थकलेल्या चुलत्यांना निवडणूकीच्या रणांगणात उभे केले होते. भालके यांच्या निधनानंतरच्या निवडणूकीत ही त्यांनी जवळपास बाय च दिला होता. त्यामूळे त्यांना विधानपरिषद निवडणूकीत ही ते वक्तव्य महागात पडू शकते अशी चर्चा आहे.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील मतदार हा पक्षनिष्ठ राहिलेला नाही. त्यामूळे लक्ष्मीदर्शन करणाराच उमेदवार विजयी होऊ शकतो हे पाठिमागच्या निवडणूक निकालांवरुन दिसून येत आहे.