हिंंगोली प्रतिनिधीः डीडी न्युज मराठी
दि. २९ जुन २०२१
राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोरोना नियमांचा मान राखत राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा थांबवत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी आज हिंगोली येथे पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यावर परभणी जिल्हयातून ही यात्रा पुन्हा सुरू करणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्याचा मराठवाड्यातील दुसऱ्या टप्प्याची २४ जूनपासून सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत उस्मानाबाद, लातूर, नांदेड आणि हिंगोली या चार जिल्ह्यातील २३ मतदारसंघांचा आढावा घेण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बुथ कमिट्या स्थापन करण्याचे व संघटना मजबूत करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पुरोगामी विचारांचा प्रसार करायला हवा. त्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे, अशा सूचना केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
मराठवाडयात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे स्वागत केले, शिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटीही दिल्या. त्यामुळे महाविकास आघाडी किती भक्कमपणे काम करतेय हे यावरून स्पष्ट होत असल्याचे जयंत पाटील म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये कसा समन्वय साधता येईल याबाबतही संवाद दौर्यात चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी नक्की शेअर करा