सातारा प्रतिनिधी : डीडी न्युज मराठी
दि. ६ जुन २०२१
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सक्षणा सलगर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन एकटीवर अत्याचार करण्याची धमकी दिली आहे, त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या सचिव स्मिता देशमुख यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत आमच्या नादी लागाल तर घरात घुसून मारु असा इशारा पडळकर यांच्या बगलबच्यांना दिला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन नुकतीच टिका केली होती. त्याचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या वतीने अनेकांनी पडळकर यांचा निषेध नोंदविला आहे. पवारांवर केलेल्या टिकेला उत्तर देताना सक्षणा सलगर यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्ला केला होता. त्यानंतर सक्षणा सलगर यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन अत्याचार करण्याची धमकी दिली आहे. तसेच, त्या अज्ञात व्यक्तीने सलगर यांना अश्लिल भाषा वापरुन गैरकृत्य केले आहे.
या वरुन सातारा येथे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन पडळकर व त्यांच्या कार्यकर्त्यांवर टिकास्त्र सोडले आहे. त्या म्हणाल्या, “आम्ही कोणाला घाबरुन घरात बसणार नाही. आम्हा महिलांना शरद पवार यांनी ताकद दिली आहे, मान सन्मान दिला आहे. त्यामूळे आमच्या विषयी वाकडी नजर करणा-यांची आम्ही गैर करणार नाही. तसेच, पडळकर यांच्या बगलबच्यांनो लक्षात ठेवा, जर का तूम्ही पुन्हा आमच्या नादी लागलात आणि धमक्या दिल्या तर घरात घुसून मारायची आमच्यात ताकद आहे.”
तसेच,देशमुख यांनी सातारा स्टाईलने प्रतिउत्तर देण्याचा ही इशारा दिला आहे. तेंव्हा, यावर आता भाजपच्या गोटातून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.