पुणे प्रतिनिधी, दि. १० मार्च २०२२ :
महिला दिनानिमित्त ‘वैष्णवी महिला उन्नती संस्थे’च्या तर्फे घरकाम करणा-या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम वानवडी आणि परिसरातील सोसायट्यांमध्ये संपन्न झाला.
‘वैष्णवी महिला उन्नती संस्थे’च्या संस्थापिका राजश्रीताई नागणे पाटील यांनी पुढाकार घेऊन हा आगवेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी धुणी-भांडी व घरकाम करणा-या महिलांचा विशेष भेटवस्तू, मिठाई आणि गुलबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आला. जवळपास एक हजारहून अधिक महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. साळुंखे विहार, क्लाऊंड नाईन, विंडसर अवेन्यू व वेष्णवी सिटीच्या सेव्हन हिल्स आदी सोसायट्यांमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
राजश्रीताई नागणे पाटील यांनी, आजपर्यंत समाजातील सर्वसामान्य महिलांच्या प्रगती सातत्याने काम केलं आहे. बचत गटांचे जाळे निर्माण करुन त्या महिलांना स्वतःच्या हक्काचे घर मिळवून देणारा देशातील पहिला गृहप्रकल्प त्यांनी उभारला आहे. त्याठिकाणी महिलांच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योगाचं जाळं निर्माण करत आहेत. या वेळी राजश्रीताई नागणे पाटील, राजदत्त फाऊंडेशनच्या संस्थापिका स्वेतल नागणे पाटील, साळुंखे विहार सोसायटीचे चेअरमन नाडकर्णी, विंडसर अवेन्यू सोसायटीचे चेअरमन आनंद दवे, क्लाऊड नाईन सोसायटीच्या चेअरमन जयश्री रंगराजन, मृणालिनी कांबळे, दत्तात्रेय नागणे पाटील, सुरज नागणे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित घरकाम करणा-या महिला अक्षरशः भारावून गेल्या होत्या, भावनिक झाल्या होत्या. त्यांच्या चेह-यावरील भाव सारं काही सांगून जात होते त्यांच्या मनातील आनंद दिसून येत होता. कारण, रोजच्या जीवनात प्रचंड कष्ट करुन चार शब्द प्रेमाचे आणि एक क्षण सुखाचा न अनुभवू शकणा-या महिला पहिल्यांदाच सन्मान स्विकारत होत्या.
या प्रसंगी बोलताना राजश्रीताई नागणे पाटील म्हणाल्या, “प्रत्येक महिला ही एक महिलाच असते, ती तळागाळातील काम करणारी कामगार असो की मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर काम करणारी एक्झिक्युटिव्ह असो. मात्र, तळागाळातील महिलांकडे अनेकदा समाजाकडून दूर्लक्ष होत असते. त्यांचा मान सन्मान सोडा विशेष दखलही घेतली जात नाही. हा विचार करुन काल महिला दिनाचं औचित्य साधून धुणी-भांडी व घरकाम करणा-या महिलांचा सन्मान केला. त्यांना विशेष गिप्ट, मिठाई व गुलाबाचे फुल आदी भेट वस्तू देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.”
त्या पुढे बोलताना म्हणाल्या, “खरं तर दुस-यांच्या घरातील मलिनता दूर करीत स्वतःच्या घराला घरपण देणा-या या महिलांचं समाजासाठी फार मोठं योगदान आहे. त्याचं समाजातील स्थान महत्वाचं आहे. मात्र, त्यांच्या वाट्याला तेवढा सन्मान येत नाही हे दुर्दैव आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जवळपास हजार एक महिलांचा सन्मान करुन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यांच्या समाजातील योगदानाचं कौतुक केलं.”
“माझं आजपर्यंतचे सामाजिक कार्य या अशा समाजातील उपेक्षित, वंचित व तळागाळातील महिलांसाठीच आहे व ते मी पुढे ही आणखी जोमानं करत राहणार आहे. कारण, या महिलांच्या चेह-यावरील आनंदच मला काम करायला आणखी प्रेरणा व नवी ऊर्जा देत असतो” असा विचार व्यक्त करुन पुढील दिशा त्यांनी स्पष्ट केली.