पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी
दि. १४ जुन २०२२
काही दिवसात होणा-या राष्ट्रपती निवडणूकीसंदर्भात शरद पवार व ममता बॅनर्जी यांची दिल्ली येथील पवार यांच्या निवासस्थानी भेट झाली. त्यामूळे शरद पवार हे देशाच्या सर्वोच्च पदावर बसणार का अशी पु्न्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.
संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रपती निवडणूकीच्या संदर्भात सध्या वेगाने हालचाली घडत आहेत. भारतीय जनता पार्टीला राष्ट्रपती निवडणूकीत त्यांच्या उमेदवाराला विजयी होण्यासाठी काही हजार मतांची गरज आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन विरोधकांच्या गोटात राजकीय व्युहरचना सुरु आहे. तेंव्हा, जर भाजपच्या समोर लढायचं असेल तर सर्वसमावेशक किंवा सर्वांना सोबत घेऊन जाणारा उमेदवार हवा आहे. त्यादृष्ट्रीने विरोधकांच्या छावणीत सध्या शरद पवार हेच एकमेव असे उमेदवार आहेत की, जे सर्वांना एकत्रित करु शकतात.
याच उद्देशाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रपती निवडणूकीच्या संदर्भात चर्चा केली. या चर्चेचा वृत्तांत जरी बाहेर आला नसला तरी शरद पवार यांनी निवडणूक लढवावी यासाठी बॅनर्जी यांनी भेट घेतल्याचे दिसून येते. मात्र, सर्व गोळाबेरीज आणि ताकद पाहून लढणारे शरद पवार हे सहजासहजी यासाठी तयार होतील असे वाटत नाही किंवा विरोधकांच्या गळाला लागणार नाही.