पुणे प्रतिनिधी :
दि. 20 जून 2022
प्रसंगावधान राखून घेतला इमर्जन्सी लॅंडींगचा त्वरित निर्णय
स्पाईसजेट च्या एसजी-723 विमानाचे रविवारी बिहारमधील पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानात 185 प्रवासी होते. विमानाच्या डाव्या इंजिनला आग लागल्याने उड्डाणानंतर लगेचच पटना येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पक्ष्याची धडक बसल्याने ही आग लागली असावी असा अंदाज आहे. या घटनेची माहिती पाटणा जिल्हा प्रशासन आणि विमानतळ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
उड्डाण केलेल्या विमानाने अचानक पेट घेतल्याचे लक्षात येताच काय मानसिक स्थिति होऊ शकते याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. शिवाय या विमानाची पायलट एक महिला होती जिचं नाव आहे कॅप्टन मोनिका खन्ना! या शूर आणि खंबीर महिलेनं प्रसंगावधान राखून त्वरित इमर्जन्सी लॅंडींगचा निर्णय घेतला. तशी सूचना तिने नियंत्रण कक्षाला दिली आणि न घाबरता, मानसिक समतोल न ढळू देता सुरक्षित लॅंडींग केले आणि तब्बल 191 प्रवाश्यांचा जीव वाचवला.
स्थानिकांनी शूट केलेल्या व्हिडिओमध्ये डाव्या इंजिनमधून स्पार्क निघताना दिसत आहेत. या विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीत वैमानिकाने विमानाचे सुरक्षित लँडिग केले त्यामुळे महिला वैमानिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. DD News Marathi सुद्धा कॅप्टन मोनिका खन्नाच्या या शौर्याला सॅल्यूट करते.