मुंबई प्रतिनिधी, डीडी न्यूज मराठी
दि. २२ जून २०२२
शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बंड पुकारलं ते आता तीव्र होताना दिसत आहे. शिवसेनेचे तब्बल ४० आमदार शिंदेंसोबत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच आमदारांचं अपहरण केल्याच्या संजय राऊतांच्या आरोपांना त्यांनी प्रत्युत्तरही दिलं आहे.
गुवाहाटीमध्ये आपल्या समर्थक आमदारांसोबत एकनाथ शिंदे पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली. “शिवसेनेचे ४० आमदार माझ्यासोबत आहेत, आणखी १० आमदार येणार आहेत!” असा दावा शिंदेंनी केला आहे. ते बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाला घेऊन पुढे जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
तसंच संजय राऊत यांनी काल शिवसेनेच्या त्या आमदारांचं अपहरण झालं असून त्यांना मारहाण झाल्याचाही आरोप केला होता. मात्र एकनाथ शिंदेंनी हा आरोप फेटाळून लावला आहे. संजय राऊत आमचे नेते आहेत. आम्ही कोणत्याही आमदाराचं अपहरण केलेलं नाही. त्यांना मारहाण केलेली नाही. सर्व आमदार स्वखुशीने आमच्यासोबत आलेले आहेत, असा खुलासा एकनाथ शिंदेंनी केला आहे.