पुणे प्रतिनिधी :
दि. 22 जून 2022
काल दि. 21 जून रोजी तुकोबाराया आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांनी अनुक्रमे देहु आणि आळंदीहून पंढरपूरसाठी प्रस्थान केले होते. देहुमधून तुकोबांच्या पादुका घेऊन पालखीने काल दि. 21 जून रोजी सकाळी प्रस्थान केले आणि माऊलींच्या पादुका संध्याकाळी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
आळंदीतून प्रस्थानावेळी अलोट जनसागर लोटला होता. तब्बल दोन वर्षांपासून लागलेली वारीची आणि दर्शनाची ओढ वारकर्यांच्या मुखावर आणि हालचालीतून स्पष्ट दिसत होती. यावर्षी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यांमधूनही वारकरी वारीत सामील झाले आहेत त्यामुळे अक्षरशः जनसागर लोटल्याचे अभूतपूर्व दृश्य आळंदीत पाहायला मिळाले. संध्याकाळी 5 वाजताची प्रस्थानाची वेळ असताना संध्याकाळी साडेसात नंतर पालखी मार्गस्थ होऊ शकली. प्रत्येकाला प्रस्थानाआधी माऊलींच्या चरणी नतमस्तक व्हायचे होते. सुमारे दोन वर्षांचा विरह असल्याने त्यांना मंदिरात प्रवेश करावयास मनाई करणे केवळ अशक्य होते.
देवळाजवळील गांधी वाड्यात काल रात्री मुक्काम करून माऊलींची पालखी आज सकाळी सहा वाजता पुण्याकडे निघाली. मॅगझिन चौकात न्याहारीसाठी आणि विश्रांतवाडीतील फुलेनगर येथे दुपारच्या जेवणासाठी थांबून पालखी संध्याकाळी 5-5.30 च्या दरम्यान संगमवाडीला येईल. इथेच तुकोबाराया आणि माऊलींची भेट होईल आणि दोन्ही पालाख्या एकत्र पुण्यनगरीत दाखल होतील.