मुंबई प्रतिनिधी :
दि. 22 जून 2022
सुशांतसिंग राजपूत प्रकरणापासूनच महाराष्ट्रात वातावरण तापू लागले होते आणि महाविकास आघाडीचे सरकार प्रश्नांच्या भोवर्यात सापडू लागले होते. त्यानंतर अनिल देशमुख प्रकरण, आर्यन खानची अटक, नवाब मलिकांच्या त्या दरम्यानच्या रोज होणार्या प्रेस कॉन्फरन्स, त्यांचे समीर वानखेडेंवरील आरोप या गोष्टींनी तर सरकारच्या अस्थिरतेवर, मतभेदांवर शिक्कामोर्तबच केले.
महाविकास आघाडीत तीन वेगवेगळ्या साईझेसच्या चाकांची रिक्षा चालते आहे असेही लोक थट्टेने बोलत होते. याला कारण तिन्ही पक्षांच्या वेगवेगळ्या विचारधारा होत्या. असं असूनही सरकार चाललं होतं. अजूनही चालतंय म्हणा, पण कॉंग्रेसचे प्रवक्ते नाना पटोलेंनी त्यावेळी बॉम्ब फोडला होता की इथून पुढे सर्व प्रकारच्या निवडणुकांमधे कॉंग्रेस स्वतंत्रपणे लढेल! ही तसं पाहिलं तर अचंबित करणारी घोषणा होती. कारण एकीकडे महाविकास आघाडीत एकत्रित संसार चालला होता तर दुसरीकडे फारकतीची भाषा होत होती.
अनिल देशमुखांची अटक, नवाब मालिकांची अटक आणि आता एकनाथ देशमुखांची बंडखोरी यांमुळे महाविकास आघाडीत मोठा बिघाड झाल्याचे चित्र जनतेसमोर आले आहे. असंही आता बहुधा फारकत होणारच आहे त्यामुळे नाना पटोलेंच्या धमकीवजा घोषणेला आता तसे काही महत्त्व उरलेले नाही. त्यामुळेच स्वतंत्रपणे लढण्याची मनीषा बाळगून असलेल्या नाना पटोलेंना पूर्ण मोकळा मार्ग मिळालाय असं लोक उपरोधिकपणे बोलत आहेत.