मुंबई प्रतिनिधी :
दि. 24 जून 2022
दोन वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात कोरिओग्राफर गणेश आचार्य गुरुवारी कोर्टात हजर झाले, त्यानंतर कोर्टाने त्यांना या प्रकरणात जामीन मंजूर करून दिलासा दिला आहे. या महिलेने फेब्रुवारी 2020 मध्ये गणेश आचार्य यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.
बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांना लैंगिक छळ प्रकरणी जामीन मिळाला आहे. मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गणेश आचार्य यांना जामीन मंजूर केला. नृत्यदिग्दर्शकावर एका महिला डान्सरने लैंगिक छळाचा आरोप केला होता, त्यानंतर पोलिसांनी गणेश आचार्य यांचे विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यावर सुनावणी करून न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे प्रकरण दोन वर्षांपूर्वीचे आहे. या महिलेने फेब्रुवारी 2020 मध्ये गणेश आचार्य यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.
या महिलेने गणेश आचार्य यांच्यावर आरोप केला होता की, जेव्हा ती त्यांच्या ऑफिसमध्ये कामासाठी गेली तेव्हा तिच्यावर आक्षेपार्ह कमेंट करण्याबरोबरच अश्लील व्हिडिओ पाहण्यासही तिला त्यांनी भाग पाडले. जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्यांनी तिला त्रास देण्यास सुरुवात केली. यासोबतच महिलेने आरोप केला आहे की, याच कारणास्तव इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन कोरिओग्राफर्स असोसिएशनने सहा महिन्यांनंतर तिचे सदस्यत्व रद्द केले. महिलेचे असेही म्हणणे आहे की, आचार्य यांनी इतर महिलांचेही लैंगिक शोषण केले आहे.
दोन वर्षांपूर्वी जेव्हा या महिलेने आरोप केला होता त्याचवेळी कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे सर्व प्रकरण म्हणजे आपल्याला अडकवण्याचा कट असल्याचे त्यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर गणेश आचार्य यांनी त्या महिलेविरुद्ध पोलिसांत प्राधान्याने गुन्हाही नोंदवला होता.