मुंबई प्रतिनिधी :
दि. 24 जून 2022
महाराष्ट्रात अचानक झालेल्या प्रचंड अनपेक्षित राजकीय घडामोडींमुळे चर्चांना आणि मत मतांतरांना उधाण आले आहे. ‘मी पुन्हा येईन’ अशी विश्वासपूर्ण गर्जना करणार्या फडणविसांचे नाव त्यांच्या मुत्सद्देगिरीमुळे पुन्हा एकवार चर्चेत आले आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले. या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसच आहेत असे जणू एकमत सर्वत्र जाणवते आहे.
त्यावर कळस म्हणजे नुकतीच शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी इतर आमदारांसह केलेली बंडखोरी! या बंडखोरीचे पडसाद महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये उमटत आहेत परंतु खुद्द शिवसेना आणि मा. शरद पवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी यामुळे पुरती हलली आहे असेच चित्र आहे. कारण एकनाथ शिंदेंनी बंडखोरीच्या कारणांमध्ये शिवसेनेने नको त्या पक्षांबरोबर केलेली युती आणि शिवसेनेच्या तत्त्वांची केलेली पायमल्ली ही कारणे प्रामुख्याने सांगितली आहेत.
मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी कर्ते करविते कोण आहेत याचे अंदाज कायमच बांधले जात होते. तशी कुजबूज ही कुणापासून लपलेली गोष्ट नाही. याच बाबत पुढे जाऊन अशी चर्चा रंगल्याचेही समजते की मा. शरद पवारांच्या पन्नास वर्षांच्या राजकीय अनुभवाला वय वर्षे पन्नास असलेल्या मा. देवेंद्र फडणवीस यांनी मात दिली आहे आणि ‘मी पुन्हा येईन’ या वचनाच्या दिशेने त्यांची वाटचाल यशस्वीपणे सुरू झाली आहे.