मुंबई प्रतिनिधी :
दि. 27 जून 2022
गुजरात दंगलींनंतर एका विशिष्ट हेतूनं ठराविक राजकीय पक्ष आणि ‘डाव्या’ विचारसरणीच्या गॅंगने पद्धतशीरपणे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा आणि त्यांना गोत्यात आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण तब्बल 20 वर्षांनंतर मा. सर्वोच्च न्यायालयाने SIT ने दिलेली क्लीन चिट कायम ठेवत ते निर्दोष असल्याचा अंतिम निकाल दिला आहे. यामुळे विरोधक तसेच प्रकरणे धगधगती ठेऊन, एखाद्याला खिंडीत गाठून आणि भारताची जागतिक पातळीवर बदनामी करत स्वतःच्या तुंबड्या भरणार्या एका विशिष्ट आणि घातक प्रवृत्तीला सणसणीत चपराक बसली आहे.
या सगळ्या प्रकरणात हिरीरिने भाग घेणार्या आणि सर्वात पुढे असलेल्या तिस्ता सितलवाड या आता ATS च्या कचाट्यात पूर्णपणे सापडल्या आहेत. 2002 सालच्या गुजरात दंगलीत मा. नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट मिळाल्याच्या दुसर्याच दिवसापासून या तिस्ता सितलवाड यांचा तिळपापड होऊ लागला. त्या आणि तत्कालीन दोन IPS अधिकारी, संजीव भट आणि आर. बी. श्रीकुमार यांच्यावर एटीएस चा चाबूक बरसला आहे. तिघेही अटकेत आहेत. स्वतःला ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणवणार्या तिस्ता यांची उलटी गिनती सुरू झाली आहे.
मोदींना ‘मौत का सौदागार’ म्हणून बदनाम करण्याचा घाट घालणार्या या सामाजिक कार्यकर्तीनेच मृतांच्या टाळूवरचं लोणी अगदी पोटभर खाल्ल्याचं उघड झालंय. त्यामुळे ही सामाजिक कार्यकर्ती आणि तिचे ‘बोलविते धनी’ दोघांच्याही डोक्यावर कडक कारवाईची तलवार लटकते आहे.
सूत्रांचं असंही म्हणणं असल्याचं समजतं की जर तिस्ता सीतलवाडची बाजू घेणार्यांना असं वाटत असेल की क्लीन चिट मिळताच मोदींनी बदला घ्यायला सुरुवात केली तर हे धादांत खोटं आहे. दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना स्पष्टपणे तिस्ता सीतलवाड यांचं नाव घेऊन त्यांची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचं सांगितलं. याला करणीभूत पण या महान समाजसेविकाच आहेत असं बोललं जातंय. याचं कारणही अतिशय धक्कादायक आहे. झाकीया जाफरी यांनी SIT च्या निर्णायविरोधात जी याचिका मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतरांविरुद्ध दाखल केली होती तिच्या सूत्रधार या तिस्ता बाईच आहेत. झाकीया जाफरी यांनी कोर्टाला सांगितल्याचं समजतं की त्यांनी जे अफिडेविट कोर्टात त्यांच्या सहीनिशी दिलं त्यात लिहिलेला मजकूर त्यांना माहीत नाही. ते सगळं तिस्ता यांनी लिहीलंय.
तिस्ता सीतलवाड बर्याच पीडितांच्या नावाचे कोरे अफिडेविट बनवून घेऊन ते नोटराईजझ करत असे आणि त्यावर पूर्वनियोजित मसुदा लिहीत असे ज्याची काडीमात्र कल्पना पीडितांना नसे. जेव्हा कोर्टात या पीडितांचं बोलणं आणि त्यांच्या अफिडेविट मधील मजकूर यांच्यात तफावत आढळली तेव्हा हा धक्कादायक प्रकार समोर आला. या तिस्ताने दंगलीतील पीडितांच्या नावे करोडो रुपये एक एनजीओ निर्माण करून लुबाडल्याचंही समजतंय.
या सगळ्या सुनावणीनंतर ही तथाकथित सामाजिक कार्यकर्ती चौकशीच्या कचाट्यात सापडली नसती तरच नवल होतं. तिस्ता यांना एटीएस नं अटक केली आहे आणि त्यांची व्यवस्थित चौकशी सुरू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही.