मुंबई प्रतिनिधी :
दि. 28 जून 2022
सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला दोन आठवड्यांपर्यंत स्थगिती दिली आहे. या आमदारांना मिळालेल्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी टोमणेबाजी केली आहे, ते म्हणाले. “कायदेशीर लढाई काहीही असो, जनतेच्या भावना वेगळ्या आहेत.”
महाराष्ट्रात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ही आग सूरत, गुवाहाटी, दिल्ली, वडोदरा असा प्रवास करत आता ‘सागर’ बंगल्यापर्यंत पोहोचली आहे असे समजते. ‘सागर’ हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अपात्रतेच्या स्थगितीनंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत पक्षातर्फे बोलत आहेत. यादरम्यानाच त्यांनी आमदारांच्या सुरक्षेवरून वरील टोमणा मारला.
तसेच मिळालेल्या माहितीनुसार बंडखोर आमदारांना 12 जुलैपर्यंत गुवाहाटीमधेच ठेवण्याची तयारी झाली आहे. त्यासाठी हॉटेलचे बुकिंगही वाढवण्यात आल्याचे समजते. पण या सगळ्या राजकीय घडामोडींदरम्यान एक आणखी विशेष बातमी आली ती उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत. असे समजते की या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मा. उद्धव ठाकरे दोनदा राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत आले होते पण मा. शरद पवारांनी त्यांना तसे करण्यापासून थांबवले. पण त्यामुळे आता लोक असंही विचारतायत की जर शरद पवार आधी या प्रकरणाला शिवसेनेची अंतर्गत बाब म्हणत होते तर मग आता ते का यात लक्ष घालतायत आणि का त्यांनी उद्धव ठाकरेंशी राजीनामा न देण्याबाबत चर्चा केली? शिवाय मा. उद्धव ठाकरे आता खरोखरच राजीनामा देण्याच्या विचारापासून परावृत्त झाले आहेत का असाही प्रश्न जनतेसमोर आहे.