पुणे प्रतिनिधी :
दि. 02 जुलै 2022
महाविकास आघाडी सरकार मधील निम्याहून अधिक शिवसेना आमदारांनी बंड केल्यामूळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावं लागले. त्यानंतर घडलेल्या दहा दिवसांच्या विविध घडामोडीतून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं आहे. मात्र, हे नवं सरकार स्थापन होण्यास शुभ पायगुण ठरला आहे तो शिवसेनेचे माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा. त्यामूळे त्याची परतफेड म्हणून पुरंदर-हवेलीसाठी विशेष काय गिप्ट मिळणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
२० जूनच्या मध्यरात्री काही बंडखोर आमदार गुजरातमधील सुरत शहरात दाखल झाले होते. त्यांनतर बंडखोर आमदारांची संख्या वाढतच गेली. रोज एक एक आमदार किंवा शिवसेनेचा नेता एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत होते. या सर्व घडामोडी घडत असताना विजय शिवतारे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांना व्हॉट्सअॅप वर पत्र लिहून “त्या आमदारांची समजूत काढायला मी जातो. माझे आणि एकनाथ शिंदेंचे चांगले संबंध आहेत” असं सांगितलं पण त्यास काही समोरुन प्रतिसाद मिळाला नाही.
विजय शिवतारे हे तब्बल 7 वर्षे पक्षाचे प्रवक्ते होते. त्या काळात पक्षाची बाजू त्यांनी अतिशय भक्कमपणे मांडली होती. त्याच अनुभवाच्या आधारे सेना फुटू नये म्हणून शिवतारे यांनी बंडखोर आमदारांना भेटून मार्ग काढण्याचे विनंती मातोश्रीला केली. पण, शेवटी काही मार्ग निघाला नाही. २२ तारखेला विजय शिवतारे हे कोरोना पॅाझिटिव्ह निघाले. सेना फुटू नये या प्रयत्नास मातोश्रीवरुन प्रतिसाद न मिळाल्याने आणि कोरोना पॅाझिटिव्ह यामूळे शिवतारे यांना चार पाच दिवस काहीच करता आलं नाही.
एका बाजूला विजय शिवतारे यांची घुसमट होत होती. परंतू, एकनाथ शिंदे व आमदारांनी हिंदुत्वासाठी आणि शिवसेनेच्या भल्यासाठी घेतलेल्या भूमिकेस पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहिर पाठिंबा देण्याचं त्यांनी जाहिर केलं. तसेच दूस-या दिवशी दुपारी त्यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या भूमिकेस पाठिंबा देणारी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषद झाल्यावर फ्लोअर टेस्ट घेण्याचा निर्णय ही शिंदे गटाच्या बाजून सुप्रिम कोर्टानं दिला. रात्री साडेनऊ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा सुपुर्त केला. त्यानंतर २४ तासाच्या आत एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित झालं. काही तासातच एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी ही पार पडला.
थोडक्यात विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेच्या भल्यासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी पाठिंबा देताच सर्व गोष्टी पॅाझिटिव्ह घडत गेल्या. याचाच अर्थ असा काढला जातोय की पायगुण ख-या अर्थाने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच लाभदायक ठरला !