मुंबई प्रतिनिधी :
दि. 04 जुलै 2022
राज्य विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन काल ता. ३ जुलैपासून मुंबईत सुरु झाले. पहिल्या दिवशी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचेअॅड. राहूल नार्वेकर हे विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे (महाविकास आघाडी) राजन साळवी यांचा पराभव केला. त्यांचे व त्यांच्या आजच्या विजयाचे मावळच्या २०१४ च्या लोकसभा पराजयाशी कनेक्शन आहे असे बोलले जात आहे. त्यांच्या या मोठ्या फरकाच्या विजयाने भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) गटात जल्लोषाचे वातावरण आहे. अॅड. नार्वेकर हे स्वतः कायद्याचे पदवीधर असून एक चांगले वक्तेही आहेत.
२०१४ च्या लोकसभेला शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी अॅड. नार्वेकरांचा मावळात पराभव केला होता. त्याची परतफेड त्यांनी आठ वर्षांनी २०२२ ला काल केली ती विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीत. शिवसेनेच्या साळवींचा त्यांनी ५७ मतांनी दणदणीत पराभव करीत २०१४ च्या शिवसेनेकडून झालेल्या तशाच पराभवाचा बदला घेतला. त्यांना १६४ तर साळवींना १०७ मते मिळाली. त्यांचा मावळमध्ये २०१४ ला जेव्हा पराभव झाला होता त्यावेळी ते राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते.
लोकसभेला तिकिट नाकारल्याने ते शिवसेनेतून राष्ट्रवादीत आले होते. त्यावेळी ते पक्षात नवखे होते. त्यात मोदी लाट आली. परिणामी युतीचे (शिवसेना) बारणे हे नगरसेवकाचे थेट खासदार झाले.
दरम्यान, गेल्या आठ वर्षात मावळच नाही,तर राज्य व देशाच्या राजकारणातही अनेक स्थित्यतंरे आली.केंद्रातील कॉंग्रेस सरकार जाऊन २०१४ ला भाजपचे सरकार आले.तसाच बदल राज्यातही झाला.दरम्यान, खासदारकीला पराभूत झालेल्या अॅड. नार्वेकरांची २०१६ ला विधानपरिषेदवर नियुक्ती झाली.नंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले आणि दुसऱ्या मोदी लाटेत ते दक्षिण मुंबईतील कुलाबा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.