मुंबई प्रतिनिधी :
दि. 04 जुलै 2022
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर आमदारांचा गट शनिवारी रात्री मुंबईत पोहोचला. मात्र, याआधी हा गट थांबलेल्या गोव्यातील ताज हॉटेलमधून दोघांना अटक करण्यात आली होती. सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार हे दोघेही हरयाणा आणि उत्तराखंड राज्यातील असल्याचे समजते. त्यांच्याकडे फेक आयडीकार्ड सापडले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या चौकशीत मोठा खुलासा झाला आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होते त्या हॉटेलमध्ये बोगस ओळखपत्राद्वारे प्रवेश करून राहणाऱ्या या व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनिया दुहान (वय 30) आणि त्यांचा सहकारी श्रेया कोठीयाल (वय 26) असल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. हॉटेलमधून अटक केलेल्यांची खरी ओळख आता पटली आहे. बनावट नावे सांगून त्यांनी हॅाटेलच्या रूमनंबर 625 मध्ये वास्तव्य केले होते.
आमदारांचे मन वळवण्यासाठी आणि त्यांना घेऊन जाण्यासाठी सोनिया दुहान येथे आल्या होत्या अशी चर्चा आहे. कलम 419, 420 अंतर्गत बोगस ओळखपत्र देणे आणि भलत्याच व्यक्तीच्या नावे हॉटेलमध्ये राहणे या अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सरकार स्थाप केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांना वेगळ्या राज्यात हॅाटेलमध्ये ठेवले होते. त्या आमदारांची हॅाटेलमधुन सुटका करण्यासाठी सोनिया दुहान यांनीच प्रमुख भूमिका बजावली होती. मात्र, शिवेसना आमदारांशी संपर्क करणे त्यांना महागात पडले असून यावेळी मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.